मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मुंबईतील पायाभूत सुविधा पुन्हा एकदा उघड्या पडल्या. देशाची आर्थिक राजधानीत दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण होते. रविवारी मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा सोमवारी निर्माण होणार आहे. सोमवारी मुंबईत जोरदार पावसाचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी १.५७ वाजता समुद्रात ४.४० मीटर उंच भरती आहे. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात येत आहे.
मुंबईत रविवारी रात्री १ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ३३० मिमी पाऊस झाला आहे.
गेल्या 24 तासात गोव्यात तब्बल 9 इंच पाऊस झाला. यामुळे गोव्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे. गोव्यात गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या पावसामुळे 4 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईतील पावसाचा मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अनिल पाटील यांना फटका बसला. तसेच दहा ते बारा आमदार रेल्वेत अडकले. विदर्भ, खान्देशातून अधिवेशनासाठी आलेले आमदारांना मुंबईतील पावसाचा फटका बसला. पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे दहा ते बारा आमदार रेल्वेत अडकले. त्यात मंत्री अनिल पाटील आणि हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे. अंबरनाथमध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेस तीन तास थांबून राहिली. यामुळे मंत्री हसन मुश्रीफ मित्राच्या गाडीतून विधानभवनाकडे रवाना झाले. मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.