कल्याण-ठाकुर्ली दरम्यान मन हेलावणारी दुर्घटना, चार महिन्याचं बाळ हातून निसटलं आणि वाहून गेलं

| Updated on: Jul 19, 2023 | 5:22 PM

अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ उभी असल्याने प्रवाशी ट्रेनमधून खाली उतरून ट्रॅकला समांतर मार्गाने चालत प्रवास करत होते. याच दरम्यान एक अतिशय दुर्देवी घटना घडलीय.

कल्याण-ठाकुर्ली दरम्यान मन हेलावणारी दुर्घटना, चार महिन्याचं बाळ हातून निसटलं आणि वाहून गेलं
Follow us on

कल्याण | 19 जुलै 2023 : महाराष्ट्रात पाऊस हवा तसा पडत नाहीय, अशी तक्रार गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांची होती. पण आता राज्यभरात पाऊस प्रचंड कोसळतोय. मुंबई, ठाणे जिल्ह्यात तर हा पाऊस जीवघेणा ठरतोय. पाऊस पडणं हे वाईट नाहीय. पण पावसामुळे ज्या घटना घडत आहेत ते खूप वाईट आहे. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, टिटवाळा, कसारा, कर्जत या भागांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. पावसाचा थेट परिणाम मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर पडला आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान अनेक लोकल गाड्या बंद पडून आहेत. तासंतास गाड्या बंद असल्याने प्रवाशांनी अखेर रेल्वेखाली उतरुन घरी परतण्याचा निर्णय घेतलाय. या दरम्यान कल्याण-ठाकुर्ली रेल्वे मार्गावर एक अतिशय दुर्देवी घटना घडली आहे.

कल्याण रेल्वे स्थानकाहून मुंबईच्या दिशेला निघालेल्या गाड्या ठाकुर्लीच्या आधी किंवा ठाकुर्ली स्थानकाच्या पुढे जावून डोंबिवली रेल्वे स्थानकावर अडकून पडत आहेत. रेल्वे रुळाखाली पाणी साचल्यामुळे तसेच काही तांत्रिक बिघाडामुळे हा मोठा खोळंबा निर्माण झालाय. असं असताना ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ उभी असलेली लोकल ट्रेन बराच काळ झाला तरी पुढे जात नाही म्हणून वैतागून प्रवाशांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला.

यामुळे अनेक प्रवासी लोकल खाली उतरुन रेल्वे ट्रॅकच्या बाजूने कल्याणच्या दिशेला पायी चालत होते. या दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एक नाला आहे. तिथे पायी चालण्यासाठी खूप कमी जागा आहे. याशिवाय तिथे पायी चालत जाणं किंवा तो मार्ग ओलांडणं हे खूप कसरतीचं काम आहे. पण तरीही अनेकजण तो नाला ओलांडून जात होते. या दरम्यान एक अनपेक्षित घटना इथे घडली.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ उभी असल्याने प्रवाशी ट्रेनमधून खाली उतरून ट्रॅकला समांतर मार्गाने चालत प्रवास करत होते. याच दरम्यान एक छोटं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई चालत होते. पण वाटेत नाल्याजवळ काकाच्या हातातून चार महिन्यांचं बाळ निसटलं आणि त्या वाहत्या पाण्यात पडलं. पाणी वाहतं असल्यामुळे बाळही वाहून गेलं.

हा दुर्देवी प्रसंग एका जन्मदात्या आईसमोर घडला. आपलं चार महिन्यांचं बाळ नाल्यात वाहून गेलं हे समजल्यानंतर आईने हंबरडा फोडला. ती प्रचंड आक्रोश करत होती. ती लेकरासाठी त्या नालाजवळ धावत जात होती. यावेळी तिथे असलेल्या इतर प्रवाशांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. तिला तिथे थांबवलं. पण या दुर्देवी घटनेमुळे घटनास्थळी असलेल्या प्रवाशांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं.

महिलेचा आक्रोशाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तातडीने प्रशासनही जागी झालं. प्रवासी आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून बाळ शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. ही दुर्देवी घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे प्रत्यक्षदर्शी अशरश: सुन्न झाले आहेत.