मुंबई: हवामान खात्याने इशारा दिल्याप्रमाणे मुंबई आणि उपनगराच्या परिसरात मुसळधार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. आज पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र, गेल्या काही तासांमध्ये ढगांचा गडगडाट आणि पावसाचा जोर आणखीन वाढला आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा खरा ठरताना दिसत आहे. (Heavy Rainfall in Mumbai)
या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून ट्विट करुन सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या समुद्रात दुपारी दीडच्या सुमारास भरती येणार आहे. त्यावेळी समुद्रात तब्बल 4.32 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. या काळात पाऊस सुरु राहिल्यास पाण्याचा निचरा होणार नाही. सध्या भरती नसूनही मुंबईतील समुद्र खवळल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी काही तास मुंबईच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत.
मुंबई , रायगड , ठाणे , पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांना झाडाखाली उभे राहू नये. तसेच बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जूहू चौपाटीवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली असून समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत.
सुप्रभात, मुंबई!
आज, उद्या व परवा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कृपया बाहेर पडणे टाळा, व समुद्रकिनारी जाऊ नका.#MyBMCMonsoonUpdate
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 12, 2021
जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून मुंबईत जोरदार बॅटिंग करत असलेल्या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई आणि कोकण परिसरात आणखी मुसळधार पाऊस (Rain) पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दोन्ही परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबच्या पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत किनारपट्टीलगत असणाऱ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल. त्यादृष्टीने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या:
Weather Alert: मुंबई आणि कोकणात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याचा रेड अलर्ट
दाणादाण! मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भागात पाणी भरले, रस्तेही पाण्याखाली!
(Heavy Rainfall in Mumbai)