Rain Update : मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल
Mumbai Rain Update : मुंबईत गेल्या अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.
मुंबई : मुंबई आणि उपनगरात पावसाची गेल्या काही तासांपासून संततधार सुरुच आहे. हवामान विभागाने मुंबई रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईत मध्येच पावसाचा जोर वाढत असल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे. पावसाचा जोर पाहता आता सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. अजूनतरी रेल्वे वाहतुकीवर काहीच परिणाम झाल्याचं वृत्त नाही. पण काही ठिकाणी रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याचं दिसत आहे.
मुंबईत पावसाची काय आहे स्थिती?
दादर, किंग्स सर्कल, माटुंगा आणि सायन मधील काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. एक फुटांपर्यंत पाणी साचल्याचं चित्र आहे. त्यामुळे गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांना आपलं इच्छित ठिकाण गाठावं लागत आहे. तसेच वाहतूक कोंडीही झाली आहे. बेस्ट सेवेनंही स्थिती पाहता त्या ठिकाणाहून वाहतूक वळवली आहे. सध्याची स्थिती पाहता घटनास्थळी महापालिकेचे कर्मचारी तैनात आहेत. तसेच पंम्पिंगच्या सहाय्याने सखल भागात साचलेल्या पाण्याचा उपसा केला जात आहे.
मरिन ड्राईव्ह, वांद्रे, मुंलुंड, भांडुप, अंधेरी या भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. इतकंच काय कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांची घरी जाण्यासाठी धाकधूक वाढली आहे. अंधेरीतही गेल्या अर्धा तासापासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाला की लगेचच यातून पाण्याचा उपसा केला जात आहे. तसेच वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून दिला जात आहे.
रायगड, ठाणे, पालघर आणि पुण्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नंदुरबार, भंडारा, अकोला, अमरावती, गडचिरोली आणि बुलढाण्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.