संध्याकाळी 5 ते रात्री 11.58 पर्यंत मतदान वाढलं कसं?, विरोधक EVM विरोधात आक्रमक
वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरुन नाना पटोले सलग दुसऱ्या दिवशी आक्रमक झाले आहेत. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 नंतर मतदान कसं वाढलं? त्याचे पुरावे देण्याची मागणी पटोलेंनी केली आहे. तसंच याप्रकरणी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचही पटोलेंनी म्हटलंय.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर मविआनं थेट ईव्हीएमवर बोट ठेवलंय. सलग दुसऱ्या दिवशी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत वाढलेल्या 76 लाख मतदानावरुन पटोलेंनी निवडणूक आयोगाला सवाल केलेत. निवडणूक आयोगानं वाढलेल्या आकडेवारी संदर्भात खुलासा करावा असं आव्हानही नाना पटोलेंनी दिलंय.
दरम्यान मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 नंतरची मतदानाची आकडेवारी किती होती. तसंच दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगानं अपडेट केलेल्या आकडेवारीवरही एक नजर टाकुयात.
संध्याकाळी 5 नंतर वाढलेल्या मतदानावर विरोधकांचा आक्षेप
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान झालं तेव्हापासून निकालापर्यंत मतांचा टक्का ३ वेळा अपडेट झाला. मतदानाच्या दिवशी ६ वाजून 14 मिनिटाच्या दरम्यान निवडणूक आयोगानं सांगितलं की महाराष्ट्रात संध्याकाळच्या ५ पर्यंत 58.22 टक्के मतदान झालंय. यानंतर रात्री ११ वाजून 53 मिनिटांनी निवडणूक आयोगानं मतदानाचा टक्का अपडेट करुन 65.02 टक्के झाल्याची माहिती दिली. यानंतर २२ तारखेला म्हणजे मतदानाच्या दोन दिवसांनी निवडणूक आयोगानं सांगितलं की महाराष्ट्रात 66.05 टक्के इतकं अंतिम मतदान झालंय.
त्यामुळे महाराष्ट्रात संध्याकाळी 5 ते रात्री ११ दरम्यान झालेलं मतदान तब्बल 7.83 टक्क्यानं वाढलं. हा टक्का म्हणजे संध्याकाळी 5 नंतर अंदाजे महाराष्ट्रात 76 लाख मतदान झाल्याचं सांगितलं जातंय.
विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर निवडणूक आयोगानही वाढलेल्या आकडेवारीसंदर्भात स्पष्टीकरण दिलंय. सायंकाळी शेवटच्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढणे ही अतिशय सामान्य बाब आहे. निमशहरी आणि शहरी भागात शेवटच्या काही तासात मतदार बाहेर पडतात, त्यामुळे मतांचा टक्का वाढतो.
सायंकाळी 6 वाजण्याआधी जो मतदार रांगेत असतो, त्याचे मतदान संपेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरूच राहते. ही रांग संपण्यासाठी कधी-कधी 6 वाजण्याची मर्यादाही पुढे जाते. 2019 मध्ये सायं. 5 वा. जवळपास 54.4% मतदान झाले होते. त्यानंतर अंतिम मतदानाची आकडेवारी 61.1% झाली.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची माहिती फोनवरून तोंडी दिली जाते. मतदान संपल्यानंतर मात्र मतदान केंद्रावरील अधिकारी फॉर्म 17-सी भरतात, ज्यात अंतिम आकडेवारी असते. महाराष्ट्रात मात्र सायंकाळी 5 नंतरही अनेक मतदार बाहेर पडून मतदान करतात.
झारखंडमध्ये 30 हजार मतदान केंद्र होती तर महाराष्ट्रात एक लाखांहून अधिक मतदान केंद्र उभारण्यात आली होती.
संध्याकाळी 5 नंतर वाढलेल्या 76 लाख मतदानावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाविरोधात न्यायालयीन आणि जमिनीवरची लढाई लढणार असल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय.
एकीकडे विरोधक ईव्हीएमविरोधात आक्रमक झाले आहेत. मात्र, मुंबईत भाजपनं ईव्हीएमच्या समर्थनात आंदोलन केलंय. तर दुसरीकडे पुण्यात ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी देशातील लोकशाही वाचावी यासाठी आंदोलन सुरु केलं. दरम्यान बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन रोहित पवारांनी अण्णा हजारांनाही टोला लगावलाय.
ईव्हीएमबाबत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय. दरम्यान विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर निवडणूक आयोगानही स्पष्टीकरण उत्तर दिलंय.