ST कर्मचाऱ्यांचा नेमका कसा पगारवाढ झाला? वेतनात नेमके किती पैसे वाढवून मिळतील? वाचा सोप्या शब्दांत
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा निघाला आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6500 रुपयांची वाढ केली आहे. पण ही वाढ वेगवेगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मिळणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आज एसटी कर्मचारी संघटनांच्या 26 प्रतिनिधींसह आज बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे 5 हजार रुपयांच्या वेतनवाढीची मागणी केली. तसेच विविध मागण्या मांडल्या. यावेळी राज्य सरकारने सकारात्मक पवित्रा दाखवला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेतली. यानंतर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल 6500 रुपयांची वाढ केली. एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा फायदा आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांसाठी 6500 रुपयांची वाढ करण्यात आली असली तरी प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी ती वाढ कशी असणार? याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
“आमची मागणी पाच हजार रुपये वेतन वाढवण्याची होती. सरकारने आमची मागणी मान्य केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये अडीच हजार, 4 हजार आणि 5 हजार अशी सरसकट वाढ मिळाली होती, त्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने सरसकट साडेसहा हजार रुपयांची वेतनात वाढ केली आहे. ज्यांना 5 हजार रुपयांची वाढ 2021 झाली होती, त्यांच्या पगारात आता दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच 2021 ला ज्यांना चार हजार रुपयांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात अडीच हजारांची वाढ झाली. ज्यांना अडीच हजारांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात 4 हजार रुपयांची भरघोस वाढ सरकारने केली आहे”, अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली. सर्व कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारात वाढीव पगारवाढ मिळेल, अशीही माहिती पडळकर यांनी यावेळी दिली.
सरकार कर्मचाऱ्यांवरील केसेस मागे घेणार
कामगार नेते किरण पावसकर यांनीदेखील याबाबत महत्त्वाची माहिती दिली. “जे कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून घरी बसले आहेत, छोट्या केसेस आहेत, शंभर रुपयांची किंवा पन्नास रुपयांची केस असेल, दहा, वीस रुपयांच्यी केस असेल, त्या सर्व कर्मचाऱ्यांची कारवाई संपवून त्यांना कामावर घ्या, अशा पद्धतीचा आदेश या बैठकीत देण्यात आलेला आहे. 2020 पासून 2024 पर्यंतची थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे”, अशी माहिती किरण पावसकर यांनी दिली.
राज्यात एकूण 250 एसटी डेपो आहेत, काही डेपो रिपेअर करायचे आहेत. कर्मचाऱ्यांचे रेस्ट रुम आहेत, ते सर्व रेस्ट रुम रिपेअर केले जातील, असं सरकाने बैठकीत सांगितल्याची माहिती समोर येत आहे.