“आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा भाग व्हायचा असेल तर…,” संजय राऊत यांनी दिला हा सल्ला
आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चाही केली आहे. भविष्यात आम्ही सर्व एकत्र बसून हे मतभेद दूर करू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
मुंबई : वंचित बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडीचा भाग व्हायचा असेल तर प्रमुख स्तंभांवर बोलू नये. असा सल्ला संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना दिला आहे. शरद पवार हे भाजपचे आहेत, अशी बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर केली. याविषयी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, याविषयी मला माहिती नाही. पण, अशाप्रकारची विधान कोणीही करू नयेत. शरद पवार हे या राज्यातीलचं नव्हे तर देशातील विरोधी पक्षांचे प्रमुख स्तंभ आहेत. शरद पवार हे सातत्याने भाजपविरोधी आघाडीसाठी प्रयत्न करतात.
भाजपच्या यंत्रणेनं सगळ्यात जास्त हल्ले शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर केले. आता शिवसेना आणि वंचित आघाडीची युती झाली. याची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
एकत्र बसून मतभेद दूर करू
संजय राऊत म्हणाले, भविष्यात प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. अशावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, प्रमुख स्तंभ यांच्यावर सर्वांना ऐकमेकांशी आदर ठेवून बोललं पाहिजे.
प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवार यांच्याशी काही मतभेद असू शकतात. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चाही केली आहे. भविष्यात आम्ही सर्व एकत्र बसून हे मतभेद दूर करू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
मालेगावात भाजपचे नेते शिवसेनेत येणार
अपूर्व आणि अद्वैत हिरे यांचे मालेगावात मोठं काम आहे. ते भारतीय जनता पक्षात होते. ते उद्या दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातलं हिरे कुटुंब राजकारणातं मोठं कुटुंब आहे. भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे हे फार मोठी परंपरा राजकारणात आहे.
अपूर्व आणि अद्वैत हे तरुण पिढीचे नेते राजकारणात आहेत. ते भाजपतून शिवसेनेत येत आहेत. नगर जिल्ह्यातून आणखी काही नेते शिवसेनेत येणार आहेत. महाराष्ट्रातून हळूहळू इनकमिंग सुरू होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्क केला.