राज्यपालांच्या विरोधातील संताप काही कमी होईना, २८ तारखेला उदयनराजे कोणती भूमिका घेणार
त्यांना दिल्लीत बोलावून समज दिली जाईल, अशी अपेक्षा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
मुंबई – राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि शिंदे गटानं आक्षेप नोंदविला. अनेक शहरांमध्येसुद्धा आंदोलनं झाली. छत्रपती शिवाजी राजे यांचे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांनीसुद्धा पत्रकार परिषद घेत राज्यपालांवर घणाघात केला. पण, राज्यपालांच्या विरोधातील हा संताप काही कमी होताना दिसत नाही. कारण २८ तारखेला पुन्हा पत्रकार परिषद घेऊन उदयनराजे आपली भूमिका स्पष्ट करतील.
कोश्यारी यांच्या वक्तव्यावर उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांसमोर येत राज्यपालांचा निषेध नोंदविला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे संकेत दिले. महाराष्ट्र द्रोह्यांना खणखणीत इंगा दाखविलाचं पाहिजे, असं ठाकरे ठाकरी शैलीत म्हणाले.
महाराष्ट्र बंद करणं, मोर्चा काढणं हे पर्याय आहेत. भाजपतील महाराष्ट्रप्रेमी लोकं एकत्र आलेत तरी त्यांना सोबत घेऊ, अशी भूमिका मांडली होती.
महाराष्ट्र बंदचे संकेत मिळत असताना आज राज्यपाल कोश्यारी हे दिल्लीत होते. यावेळी त्यांनी कुणाची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरून काही चर्चा झाली का, हे कळू शकलं नाही.
राज्यपालांबाबत केंद्र सरकारला कळविलं आहे. त्यामुळं त्यांना दिल्लीत बोलावून समज दिली जाईल, अशी अपेक्षा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
आता २८ तारखेला उदयनराजे कोणती भूमिका घेणार हे बघावं लागेल. कारण काल उदयनराजे यांनी राज्यपालांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी भूमिका मांडली.