IIT-Bombay : ‘रामायणा’चा अपमान करणं आयआयटी-बॉम्बच्या विद्यार्थ्यांना महाग पडलं, चुकवावी लागली मोठी किंमत
IIT-Bombay : नाटकातून 'रामायणा'चा अपमान करणं IIT-Bombay च्या विद्यार्थ्यांना चांगलच महाग पडलं आहे. परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिव्हल हा आयआयटी-बॉम्बेचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्यात हे नाटक सादर करण्यात आलं होतं.
रामायणाचा अपमान करणं IIT-Bombay च्या आठ विद्यार्थ्यांना चांगलच महाग पडलं आहे. आयआयटी-बॉम्बच्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या वार्षिक कला महोत्सवात 31 मार्च रोजी ‘राहोवण’ नावाच एक नाटक सादर केलं. ‘राहोवण’ हे रामायणावर आधारित नाटक होतं. यात रामायणाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला होता. IIT-Bombay ने या तक्रारीची दखल घेत आठ विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1.2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्रॅज्युएशनला असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1.2 लाख रुपये आणि ज्यूनियर विद्यार्थ्यांना 40 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तक्रारी मिळाल्यानंतर शिस्त पालन समितीची स्थापना करण्यात आली. त्यांनी केलेल्या शिफारशींच्या आधारावर संस्थेने ही दंडात्मक कारवाई केली आहे.
परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिव्हल हा आयआयटी-बॉम्बेचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. यावर्षी मार्चमध्ये हा फेस्टिव्हल झाला. त्यावेळी ओपन-थिएटरमध्ये ‘राहोवण’ नाटक सादर करण्यात आलं. काही दिवसात या नाटकातील काही क्लिप्स व्हायरल झाल्या. रामायणाचा संदर्भ असल्याने कलेच स्वातंत्र्य आणि धार्मिक भावना दुखावण यावरुन वादविवाद सुरु झाले. संस्थेकडे या विरोधात लिखितमध्ये तक्रारी करण्यात आल्या. एका तक्रारदाराने TOI शी बोलताना सांगितलं की, “‘राहोवण’ नाटक अनेक अंगानी अपमानास्पद वाटलं. विद्यार्थ्यांनी स्त्रीवादाच्या नावाखाली संस्कृतीची खिल्ली उडवली”
माहिती सोशल मीडियावर कशी लीक झाली?
विद्यार्थ्यांनी त्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक स्वातंत्र्याचा गैरवापर केला. यापुढे भविष्यात कॅम्पसमध्ये कुठल्याही धर्माचा अपमान होऊ नये, यासाठी संस्थेने मार्गदर्शकतत्व आखून द्यावीत असा एका सोशल मीडिया हँडलवर दावा करण्यात आला आहे. ही खूप कठोर कारवाई असल्याच काही विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. प्रेक्षक आणि परीक्षकांनी हे नाटक चांगल्या पद्धतीने स्वीकारल होतं, असं काही विद्यार्थ्यांच म्हणण आहे. IIT-Bombay च्या पदाधिकाऱ्यांनी यावर काहीही भाष्य केलेलं नाहीय. कारवाई संबंधीची गोपनीय माहिती सोशल मीडियावर कशी लीक झाली? या संदर्भात संस्थेने स्पष्टीकरण द्याव अशी मागणी एका दुसऱ्या विद्यार्थ्याने केली.