Mumbai Manhole : मुंबईत मॅनहोलच्या झाकणाची चोरी का होते? भंगारात किती किंमत मिळते तुम्हाला माहितीय का?
Mumbai Manhole : मुंबईत दर दिवसाला किती मॅनहोलच्या झाकणांची चोरी होते?. मुंबईत मागच्या पाच महिन्यात अशा किती झाकणांची चोरी झालीय? मागच्यावर्षी किती झाकणांची चोरी झालेली? ती माहिती समोर आलीय.
मुंबई : मुंबईकर सध्या मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. मान्सून राज्यात दाखल झालाय. पण मान्सूनच्या सरी अजून बरसलेल्या नाहीत. फक्त अधून-मधून रिमझिम पाऊस झालाय. मुंबईत मान्सूनच्या पावसाची चर्चा होते, त्यावेळी मॅनहोलच्या झाकणाचा सुद्धा विषय येतो. कारण एक-दोन तासाचा मुसळधार पाऊसही मुंबईला ब्रेक लावायला पुरेसा असतो. मुंबईत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मॅनहोल्स महत्वाचे ठरतात. पण मॅनहोल्सच्या झाकणारी चोरी ही एक समस्या आहे.
मुंबईत जानेवारी ते मे दरम्यान एकूण 332 मॅनहोल्सच्या झाकणाची चोरी झालीय. मुंबई महापालिकेच्या पाहणीत हे आढळून आलय. ही सर्व झाकणं ओतीव लोखंडापासून बनवलेली होती.
मुंबईत महिन्याला सरासरी किती मॅनहोल्सच्या झाकणाची चोरी होते?
पाच महिन्याचे आकडे पाहिले, तर दर महिन्याला सरासरी 55 मॅनहोल्सच्या झाकणाची चोरी झालीय. 2022 च्या तुलनेत हे प्रमाण थोडं कमी आहे. त्यावेळी दर महिन्याला सरासरी 70 मॅनहोल्सच्या झाकणांची चोरी व्हायची. मलबार हिल, ताडदेव या वॉर्ड डी मध्ये सर्वाधिक 108 झाकणांची चोरी झाली होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
2020 मध्ये किती झाकणांची चोरी झालेली?
2020 मध्ये मुंबईत एकूण 458 मॅनहोल झाकणांची चोरी झाली होती. मागच्यावर्षी हाच आकडा वाढून 836 झाला. चालू वर्षात पहिल्या पाच महिन्यात चोरी झालेल्या झाकणांची सरासरी पाहिली, तर 2021 पेक्षा हा आकडा जास्त असू शकतो.
प्रसिद्ध डॉक्टरचा मृत्यू
झाकण नसलेले मॅनहोल्स नागरिकांच्या जीवावर बेततात. अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. पावसाच पाणी साचल्यानंतर उघड्या गटारात पडून अनेकांचा मृत्यू होतो. ऑगस्ट 2017 मध्ये प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर उघड्या मॅनहोल्सचा समस्येच गांभीर्य लक्षात आलं.
कुठल्या भागातून सर्वाधिक चोरी होते?
मागच्यावर्षी 2022 मध्ये डी वॉर्ड ताडदेव, मलबार हिल, के वेस्ट अंधेरी, के इस्ट जोगेश्वरी, विलेपार्ले या भागातून सर्वाधिक मॅनहोल्सच्या झाकणाची चोरी झाली होती. “उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या भागातून सर्वाधिक मॅनहोल्सची चोरी झाली. कारण तिथे राहणाऱ्या नागरिकांच फार लक्ष नसतं. त्यामुळे चोर अशा भागांना लक्ष्य बनवतात” असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. भंगारात किती किंमत मिळते?
“मॅनहोल्सची ही झाकणं ओतीव लोखंडापासून बनवलेली असतात. भंगार बाजारात या झाकणांना चांगली किंमत मिळते” असं अधिकाऱ्याने सांगितलं. या एका मॅनहोलच्या कव्हरच वजन 60 ते 70 किलो असतं. भंगार बाजारात एका मॅनहोल झाकणासाठी 1००० ते 1500 रुपये मिळतात.