जितेंद्र आव्हाडांवरील गुन्ह्याप्रकरणी मुलगी नताशा यांनी भूमिका केली स्पष्ट, म्हणाल्या,…
अशा आरोपांमुळं त्याचा परिणाम फक्त संबंधित व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण कुटुंबावर होतो, असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर राष्ट्रवादीसह, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेतेही त्यांच्या बाजूनं बोलत आहेत. महाविकास आघाडीचे नेतेही जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीनंही संबंधित व्हिडीओ क्लीप दाखविणार असून, यात कुठं विनयभंग झाला, ते तुम्हीचं ठरवा असं म्हंटलं. पोलिसांनी आपल्या कारवाईचं समर्थन केलं. तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल केला. याचा योग्य तो तपास होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या सर्व वादात आता जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.
नताशा जितेंद्र आव्हाड म्हणाल्या, माझ्या वडिलांवर गंभीर आरोप केला आहे. हा आरोप खूपच धक्कादायक आहे. आमच्या कुटुंबाला यामुळं खूप मानसिक त्रास झाला आहे. काल रात्रीपासून माझे बाबा झोपले नाहीत. कार्यकर्ते आणि नातेवाईक खूप मानसिक त्रासात आहोत.
राजकारणात वाद-विवाद होत राहतात. पण, अशा आरोपांमुळं त्याचा परिणाम फक्त संबंधित व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण कुटुंबावर होतो, असंही त्यांनी सांगितलं.
या तरतुदी या महिलेच्या सुरक्षेसाठी बनविण्यात आलेल्या आहेत. याचा परिणाम संबंधित महिलेवर होत आहे. याचं भान आपण ठेवलं पाहिजे. महिला सशक्तीकरणाच्या चळवळीवरही याचा परिणाम होतोय. मी याठिकाणी मुलगी म्हणून समोर आली आहे. त्यामुळं मी राजकीय काही बोलणार नसल्याचं नताशा यांनी सांगितलं.