इंडिया आघाडीच्या बैठकीतील आतली बातमी, महाराष्ट्राच्या दोन बड्या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी
इंडिया आघाडीच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांची माहिती आता समोर येत आहे. इंडिया आघाडीची लवकरच सविस्तर पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. पण त्याआधीच एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.
मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : देशभरातील 28 विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक सुरु आहे. मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये ही बैठक पार पडत आहे. या बैठकीतील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या बैठकीत 13 जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नावाचा समावेश आहे.
समन्वय समितीत कोण-कोण?
काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल, डीएमकेचे एम के स्टेलिन, आरजेडीचे तेजस्वी यादव, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चढ्ढा, जावेद अली खान, ललन सिंह, डी राजा आणि ओमर अब्दुला, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, महाराष्ट्रातून शरद पवार आणि संजय राऊत यांचा या समन्वय समितीत समावेश असणार आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार मध्यस्थी करणार
मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढत आहेत. याचा फटका इंडिया आघाडीवर होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात समझोता करण्यासाठी ऊद्धव ठाकरे आणि शरद पवार मध्यस्ती करणार आहेत.
सोनिया गांधी दिल्लीसाठी रवाना
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आल्या होत्या. इंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांबबात लवकरच माहिती समोर येण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीची दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत बैठकीत काय-काय चर्चा झाली, या विषयी माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान, ही बैठक आटोपल्यानंतर सोनिया गांधी दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत.
काँग्रेस अध्यक्षांचं बैठकीत मोठं वक्तव्य
दरम्यान, या बैठकीत इंडिया आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी निवडणुकीचा काळ हा आपल्या सर्वांसारखी कठीण असण्याची शक्यता आहे. आपल्याला प्रचंड त्रास दिला जाऊ शकतो. आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये देखील टाकलं जाऊ शकतं. त्यामुळे तयार राहा. आपली सहनशीलतेचा अंत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहा, असा इशारा मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्वांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.