इंडिया आघाडीचा मुंबईत येऊन मास्टर स्ट्रोक, ‘त्या’ एका निर्णयामुळे भाजपच्या स्वप्नांवर पाणी?; महाराष्ट्रात बसणार मोठा फटका
इंडिया आघाडीने 13 सदस्यांची समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : इंडिया आघाडीची कालपासून मुंबईत बैठक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत ताकदीने भाजपच्या विरोधात उभं राहण्यासाठी या बैठकीत चर्चा सुरू आहे. काही महत्त्वाचे ठरावही करण्यात आले आहेत. या बैठकीत इंडिया आघाडीतील विरोधकांची एकजूटही अभेद्य असल्याचं दिसून आलं आहे. विरोधकांची ही तिसरी बैठक आहे. पण त्यातून एकही पक्ष गळालेला नाही. त्यामुळे विरोधक एका ध्येयाने एकत्र आल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भाजप पुढे इंडिया आघाडीचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांची एकजूट पाहून भाजपची डोकेदुखी वाढलेली असतानाच इंडिया आघाडीने मुंबईत येऊन एक मास्टरस्ट्रोक मारला आहे. त्यामुळे भाजपच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे.
काय आहे मास्टर स्ट्रोक
इंडिया आघाडीच्या बैठकीत आज तीन मोठे ठराव करण्यात आले आहेत. जागा वाटप लवकरात लवकर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. देशातील वेगवेगळ्या भागात सभा घेऊन मोदी सरकारला एक्सपोज करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. जुडेगा भारत आणि जुडेगा इंडिया या स्लोगनचा प्रचार विविध भाषेत करण्याचा आणि सोशल मीडियातून त्याचा प्रचार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र, यातील सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक इंडिया आघाडीने मारला आहे. तो म्हणजे समन्वय समितीचा.
आजच्या बैठकीत 13 सदस्यांची समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीतील सदस्यांवर सर्व 28 पक्षांच्या नेत्यांशी समन्वय साधण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांना या समितीत घेऊन आघाडीने मास्टर स्ट्रोक मारला आहे.
मास्टर स्ट्रोक कसा?
अजित पवार यांचा गट भाजपसोबत आल्यानंतर भाजपचं बळ वाढलं आहे. शरद पवर यांनीही अजित पवार यांच्यासोबत यावं म्हणून भाजप पाण्यात देव ठेवून आहे. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना भाजपसोबत येण्याची विनंतीही केली. पण पवारांनी ही विनंती धुडकावून लावली. शरद पवार यांच्या हातून पक्ष काढून घेण्यासाठी अजितदादा गटाने निवडणूक आयोगात धाव घेऊन पवारांची घेराबंदी करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही शरद पवार बधले नाहीत.
शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रिपदाची आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफरही देण्यात आली. पण पवारांनी या ऑफर्सही नाकारल्या. तरीही शरद पवार हे लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्यासोबत येतील असं भाजपला वाटत होतं. पण इंडिया आघाडीने थेट शरद पवार यांची समन्वय समितीत वर्णी लावून भाजपचं स्वप्न धुळीस मिळवलं आहे.
महाराष्ट्रात फटका बसणार
शरद पवार आपल्यासोबत येतील अशी भाजपला आशा होती. शरद पवार सोबत आल्यावर महाविकास आघाडी निष्प्रभ ठरेल असा भाजपचा अंदाज होता. पण शरद पवार यांना इंडिया आघाडीने मोठी जबाबदारी दिल्याने भाजपची मोठी गोची झाली आहे. अजितदादा गट भाजपसोबत असला तरी शरद पवार जोपर्यंत आहेत तोपर्यंत भाजपला महाराष्ट्र जड जाणार आहे.
शरद पवार यांची राज्यातील राजकारणावर मांड आहे. सत्तेचं गणित कधीही फिरवण्याची शरद पवार यांची क्षमता आहे. पवारांमुळे महाविकास आघाडी महायुतीला डोईजड जाऊ शकते हे भाजपलाही माहीत आहे. त्यातच इंडिया आघाडीने मोठी खेळी केल्यामुळे आता महाराष्ट्रातही भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.