‘त्या’ घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी
किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याबाबत जी घटना घडली, याची मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी सरकारकडे केली आहे.
मुंबई : किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याबाबत जी घटना घडली, याची मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी सरकारकडे केली आहे. आशिष शेलार यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. (Inquire Kirit Somaiya incident from a retired High Court judge, Ashish Shelar demands)
शेलार यावेळी म्हणाले की, राज्यात ‘तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त’, अशी स्थिती निर्माण झाली असून राज्य अराजकतेकडे जात आहे. त्यामुळे पत्रकार, संपादक, बुद्धिजीवी वर्ग, सामान्य नागरिकांनी आता बोललं पाहिजे. विरोधीपक्ष म्हणून आम्ही आमचे काम करीत आहोतच, पण सामन्यांनीदेखील आवाज उठवायला हवा.
कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या जात होते. त्यावेळी सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून पोलीसांकडून रोखण्यात आले. किरीट सोमय्या यांनी आधीच सांगितलं की, आपण अमूक एका ठिकाणी तक्रार नोंदवण्यासाठी जाणार आहे. त्यावेळी काल मुंबईत शंभर सव्वाशे पोलीस नीलम नगरला घेराव घालून होते. हा पोलिसांचा गैरवावर नाही का? असा सवालही शेलारांनी केला आहे. एका नागरिकाला, एका नेत्याला, एका माजी खासदाराला खोटी आणि बोगस नोटीस दाखवली जात होती. ज्या जिल्ह्यातून ही नोटीस काढली त्या पोलिसांनी मुंबईतील लोकल पोलिसांकडे एन्ट्री केली होती का? सोमय्यांना नोटीस दाखवण्याची पद्धत आणि खऱ्या नोटीसला उशीर का झाला? अशी प्रश्नांची सरबत्तीच शेलार यांनी यावेळी केली.
‘निवृत्त न्यायाधीशांकडून प्रकरणाची चौकशी करावी’
या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सांगितले जाते याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढते. पोलीस ठाण्यात तक्रार करायला जाण्यास रोखणे, त्यासाठी जे कारण दिले तेही संशयास्पद आहे. गुन्हेगार कोण हे माहिती आहे. कायदा आणि सुव्यवस्था कोण हाती घेईल हे माहिती आहे, तो कुठल्या पक्षाचा हेही माहिती आणि मग कारवाई कुणावर आणि अटकाव कुणाला करताय? एकप्रकारे सरकारी यंत्रणेनं गुन्हा केला आहे. काही बातम्या समोर आल्या त्यात शिवसेनेचे नेते म्हणतात की, मुख्यमंत्र्यांना अवगत केलं गेलं नव्हतं. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी आज शेलार यांनी भाजपच्या वतीनं केली आहे.
राज्य अराजकतेकडे जातेय : शेलार
राज्यात गेल्या काही दिवसात असेच दुर्दैवी चित्र आहे. समाज माध्यमांवर जे बोलले त्यांना मारण्यात आले, एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडण्यात आला, सरकारविरोधात बोलले म्हणून एका संपादकांना घरात घुसून अटक करण्यात आली, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे बोलणे दखलपात्र गुन्हा करुन त्यांना अटक करण्यात आली, दहशतवादी कारवाया राज्यात होतात त्याची माहिती पोलिसांकडे नाही. हे सर्व पाहिले की, राज्य अराजकतेकडे जाते आहे. अराजकता राज्यकर्ते माजवत आहेत.
‘आता मुख्यमंत्र्यांनी म्हणावं, मी बेजबाबदार…’
मुख्यमंत्री कोरोना काळात म्हणत होते की मी जबाबदार. पण आता मुख्यमंत्र्यांना गोष्टी माहिती नसल्याचे शिवसेनेचे नेते सांगतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता मी बेजबाबदार अशी घोषणा द्यावी, असा खोचक टोलाही शेलार यांनी लगावला आहे.
इतर बातम्या
किरीट सोमय्यांकडून आरोपांच्या फैरी, अजित पवारांनी एका वाक्यात निकाल लावला!
आता महाविकास आघाडीही वात पेटवणार, फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार; नाना पटोलेंचा इशारा
(Inquire Kirit Somaiya incident from a retired High Court judge, Ashish Shelar demands)