नव्या विषाणूला रोखायचंय? मास्क कसा आणि कोणता वापराल?, टास्क फोर्सने दिल्या सूचना
ओमिक्रॉनला रोखण्याचा एकच मार्ग आहे - दुहेरी मास्क घाला, मोकळ्या हवेत राहा, आणि लसींचे दोन्ही डोस घ्या, असे टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.
मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली टास्क फोर्स सोबत बैठक झाली. या बैठकीत कोरोनाच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत टास्क फोर्सने सूचन्या केल्या. विषाणूला रोखण्याचा सर्वात पहिला पर्याय म्हणजे मास्क. हा मास्क कसा आणि कोणता वापरायचा याबाबत टास्क फोर्सने माहिती दिली. यावेळी टास्क फोर्सच्या डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी व डॉ राहुल पंडित यांनी देखील यासंदर्भात काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले.
विषाणूला रोखण्यासाठी डबल मास्क घालणे योग्य राहील. सर्जिकल 3 प्लाय मास्क आणि एन 95 प्रकारातील एक मास्क घालणे उचित ठरेल. खाताना किंवा जेवताना जेव्हा मास्क काढलेला असेल तेच अधिक संधानात बाळगणे गरजेचे आहे. आवश्यक गर्दी टाळा, आवश्यक असेल तरच प्रवास करा. ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी ती त्वरित घ्यावी. ओमिक्रॉनला रोखण्याचा एकच मार्ग आहे – दुहेरी मास्क घाला, मोकळ्या हवेत राहा, आणि लसींचे दोन्ही डोस घ्या, असे टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.
ओमिक्रॉनचे पन्नासहून अधिक म्युटेशन
कोविडच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक आहे. डेल्टाची जागा ओमिक्रॉनने अवघ्या दोन आठवड्यात घेतली, यावरून त्याची घातकता लक्षात येते. दुसऱ्या लाटेस कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमिक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत. हा व्हेरिएंट सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतो किंवा नाही ते डॉक्टर्स आणि तज्ज्ञ जाणून घेत आहेत. पण घाबरून न जाता आपण काळजी घेण्याची गरज आहे. कारण याचा संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे, असेही डॉ. शशांक जोशी म्हणाले.
“कुछ नही होता यार” असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो
यावेळी कोरोनाला रोखण्याबाबत मुख्यमंत्र्यांनीही मार्गदर्शन केले. आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. “कुछ नही होता यार” असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असे पहा. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ अजित देसाई, डॉ खुस्राव्ह बजान, डॉ केदार तोरस्कर, डॉ झहीर अविराणी , डॉ वसंत नागवेकर, डॉ नितीन कर्णिक, मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थिती होती. (Instructions given by the task force on how and which mask to use)
संबंधित बातम्या