अजित पवार यांची भाजपपासून वेगळी भूमिका, एकदा होऊन जा द्या…नेमके काय म्हणाले अजितदादा
Exclusive interview with Ajit Pawar: प्रत्येक जण आम्ही इतके आहोत, असा दावा करत आहे. प्रत्येकाच्या दाव्यांची बेरीज केल्यावर ही संख्या २०० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. आम्ही आहोत १३५ कोटी. त्यामुळे एकदा जातीय जनगणना होऊन जा द्या. मग कळेल ओबीसी किती, आदिवासी किती, एस अन् एसटी किती आणि खुल्या प्रवर्गातील लोक किती.
राज्यात महायुतीमध्ये तीन पक्षाचे सरकार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये आहे. काही गोष्टींवर सर्वांचे एकमत नसले तरी महायुती म्हणून एक भूमिका घेतली जाते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ जातीय जनगणनेची मागणी करत आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात जातीय जनगणनेची मागणी लावून धरली होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात त्याला जोरदार विरोध केला होता. भाजपचाही जातीय जनगणनेस विरोध आहे. परंतु भाजपसोबत असणारे अजित पवार यांनी प्रथमच या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी जातीय जनगणना करण्याची मागणी केली.
…तर आम्ही २०० कोटी
एएनआयसाठी स्मिता प्रकाश यांनी अजित पवार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांना जातीय जनगणनेसंदर्भात तुमची काय भूमिका आहे? हा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, प्रत्येक जण आम्ही इतके आहोत, असा दावा करत आहे. प्रत्येकाच्या दाव्यांची बेरीज केल्यावर ही संख्या २०० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. आम्ही आहोत १३५ कोटी. त्यामुळे एकदा जातीय जनगणना होऊन जा द्या. मग कळेल ओबीसी किती, आदिवासी किती, एस अन् एसटी किती आणि खुल्या प्रवर्गातील लोक किती. देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. त्यामुळे जातीय जनगणना करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
मुख्यमंत्री महायुतीचा पण…
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यासाठी अजून कोणाचे नाव निश्चित केले गेले नाही. आम्ही सर्व तिन्ही पक्षातील आमदार एकत्र बसून ठरवणार आहोत. फक्त महायुतीचा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाधिक महायुतीच्या जागा निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवण्यात येईल.
खरी शिवसेना कुणाची हे मी काय सांगू शकतो? शिंदे म्हणतात बाळासाहेब आज जिवंत असते तर ते काँग्रेससोबत गेली नसते. त्यांचे म्हणणे २०१९मध्ये जी आघाडी झाली ती व्हायला नको होती. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चालत आहोत. बाळासाहेब काँग्रेसच्या विरोधात होते, असा दावा शिंदे करत आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची आपण सांगू शकत नाही.
हे ही वाचा…
पुणे, मुंबईत पाणी का तुंबते, कोणीही आले तरी काहीच…अजित पवार यांनी रोखठोक सांगितले