महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख चर्चेत आले आहेत. अनिल देशमुख यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत. त्याला देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिले. त्यानंतर सोमवारी अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाचा संदर्भ दिला. चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर का आणला जात नाही? असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला. त्यावेळी अनिल देशमुख यांनी अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटक ठेवण्याबाबत सर्वात खळबळजनक आरोप केला. माजी आयपीएस अधिकारी परामबीर सिंग हे त्या प्रकरणाचे मास्टर माईंड होते. मनसुख हिरेन यांच्या खून प्रकरणात परमबीर सिंह यांना अटक होणार होती. त्यामुळे ते फडणवीस यांना शरण गेले आणि माझ्यावर आरोप केले, असे अनिल देशमुख यांनी म्हटले. त्याला आता परमबीर सिंह यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना उत्तर दिले.
‘टीव्ही 9 मराठी’ने परमबीर सिंह यांनी प्रश्न विचारला की, आपण मनसूख हिरेन प्रकरणात अडकणार होते. त्यामुळे फडणवीस यांच्या सांगण्यावरुन आरोप केले, असे अनिल देशमुख म्हणत आहेत. त्यावर परमबीर सिंह म्हणाले, मी प्रथम हे स्पष्ट करु इच्छितो की, माझी आयएएस म्हणून प्रतिमा अगदी स्वच्छ राहिली आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख फक्त मुंबईतूनच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणावरुन वेगवेगळ्या एजंटच्या माध्यमातून वसुली करत होते. हे सर्व सीबीआय तपासातून समोर आले आहे.
मी त्यांच्यावर आरोप केल्यानंतर संजय पांडे यांनी मला धमक्या दिल्या होत्या. त्या धमक्या मी रेकॉर्डसुद्धा केल्या होत्या. ते रेकॉर्ड मी सर्वोच्च न्यायालयात आणि तपास संस्थांनाही दिले आहे. संजय पांडे यांनी मला म्हटले होते की, मी अनिल देशमुख यांच्या विरोधातील खटला काढला नाही तर माझ्याविरोधात खोटे गुन्हा दाखल केली जातील. मला फसवण्यात येईल. परंतु मी घाबरलो नाही. मी पूर्ण तपासाला सहकार्य केले.
या सर्व प्रकरणात अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख मला वरळीमधील कॉफी शॉपमध्ये भेटले होते. त्या भेटीत सलील माझ्या गयावया करु लागला. मला खटला मागे घेण्याची सारखी विनंती करत होता. माझ्या पाया पडत होता. आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. हवे तर अनिल देशमुखसुद्धा तुमची माफी मागतील. तुम्हाला डीजी केले जाईल. परंतु आपण त्यांचे सर्व प्रस्ताव फेटाळले, असे परमबीर सिंह यांनी म्हटले.
परमबीर सिंह पुढे म्हणाले की, मी आरोप केल्यानंतर मार्च किंवा एप्रिल महिन्यात माझी आणि सलील देशमुख यांची भेट झाली होती. त्यावेळी अनिल देशमुख कारागृहात गेले नव्हते. मी आता जे आरोप करत आहे, त्यातील शब्द न शब्द खरा आहे. त्यासंदर्भात नार्को टेस्ट करण्यास तयार आहे. पण अनिल देशमुख, सलिल देशमुख आणि संजय पांडे यांचीही नार्को टेस्ट करावी, असे परमबीर सिंह यांनी सांगितले.