मुंबई : विरोधक राज्यपालांना हटवण्याची मागणी करत आहेत. खासदार उदयनराजे भोसलेही आक्रमक झाले आहेत. त्यातच आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यावरुन चर्चा होतेय. बावनकुळेंनी राज्यपालांचं विधान चूकच असल्याचं म्हटलंय. त्यामुळे राज्यपालांवर आता कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं हे वक्तव्य फार महत्वाचं आहे. राज्यपाल कोश्यारींच्या शिवरायांवरील वक्तव्यावरुन विरोधक त्यांना हटवण्याची मागणी करतायत. त्यातच भाजपनं प्रथमच, राज्यपालांकडून चूकच झाल्याचं म्हटलंय.
राज्यपालांची चूक झाल्याचं सांगतानाच, त्यांना ठेवायचं की नाही, याचा निर्णय आमच्या हातात नाही, असंही बावनकुळे म्हणालेत. म्हणजेच, केंद्राकडून कारवाईचे संकेत आहेत का? अशीही चर्चा आहे.
आता जरा क्रोनोलॉजी अर्थात घटनाक्रम समजून घेऊयात. आधी उदयनराजे भावूक झाले. 28 नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत, उदयनराजे भावूक झाले. तसं पत्रकार परिषदेत उदयनराजे आक्रमकही असतात आणि कधी कधी कॉलर उडवून हशाही पिकवतात. पण राज्यपालांच्या शिवरायांवरील वक्तव्यावरुन राजेंना अश्रू अनावर झाले. आणि शिवरायांचा अपमान पाहण्याऐवजी मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी मनाला भिडणारी प्रतिक्रिया दिली.
सोमवारी 28 नोव्हेंबरला उदयनराजे भावूक झाले. आणि त्याचदिवशी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली. उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहचवल्याचं फडणवीस म्हणालेत.
योग्य ठिकाण म्हणजे केंद्रीय नेतृत्वचं असू शकते. म्हणजेच फडणवीसांनीही राज्यपाल कोश्यारींवर नेतृत्वाकडून कारवाई होऊ शकते असेच संकेत दिलेत.
उदयनराजे भावूक झाल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही प्रतिक्रिया दिलीय. हतबल होऊन चालणार नाही तर लढा, असं आवाहन शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना केलंय.
देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, उदयनराजे असो की शिवेंद्रराजे हे सर्व जण भाजपचेच आहेत. उदनराजेंची मागणी, ही राज्यपालांना हटवण्याची आहे. तर भाजप कोश्यारींच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं नाही. उलट आता बानकुळेंनी तर राज्यपालांची चूकच झाल्याचं म्हटलंय.
दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरतायत. अपमान करणारे राजभवनात आहेत. आणि मुख्यमंत्री तोंड शिवून बसलेत, अशी बोचरी टीका राऊतांनी केलीय.
कोश्यारी महाराष्ट्रात नको, अशी आक्रमक भूमिका विरोधकांची आहे. तर आता फडणवीसांपाठोपाठ बावनकुळेंनी जी प्रतिक्रिया दिलीय, तीही फार सूचक आहे. त्यामुळं कोश्यारींवर कारवाई होणार का? राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंकडून राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी होईल का? हे लवकरच स्पष्ट होईल.