विधान भवन झालं, BMC झालं, आता शिंदे गटाचा डोळा शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या वास्तूवर?
शिंदे गट ठाकरे गटाचं शक्तीस्थळ असलेल्या सर्वात महत्त्वाच्या वास्तूवर दावा तर करणार नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होतोय.
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनी नुकतंच शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील कार्यालयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवकांनी शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटात राडा झाल्यानंतर आज अखेर मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं कार्यालय सील करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाकडून देण्यात आलीय. या सगळ्या गदारोळानंतर आता शिंदे गट ठाकरे गटाचं शक्तीस्थळ असलेल्या सर्वात महत्त्वाच्या वास्तूवर दावा तर करणार नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण आमदार रवी राणा यांनी याबबात महत्त्वाचं विधान केलंय.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेना भवनाचा ताबा घ्यावा”, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलंय. त्यांच्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले.
“त्यांचे बाप आले पाहिजेत. त्यांचा एक बाप असतील तर ते येतील. शिवसेना भवनावर ताबा कोण घेणार? शिवसेना भवन हे बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलंय. ते शिवसैनिकांचं आहे. ते बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावानेच राहील. अशा घोषणा आणि वल्गना खूप होतात. तुमच्याकडे घटकेची सत्ता आहे. ती सांभाळा. तुम्हाला कळेल”, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांच्या टीकेला शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलं. “आमच्या बापांमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही तयार झालोय. आमच्या बापांपर्यंत जाऊ नका. आम्ही त्याच खऱ्या बापाचे होतो म्हणून तुम्हाला आमचा हिसका दाखवला. आमच्या नादाला लागू नका”, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला.
“एकनाथ शिंदे यांचा नाद तर कुणी करायचाच नाही. आता कुत्रा भूंकतो तो कधी चावत नाही आणि गरजणारा कधी पडत नाही. त्याप्रमाणे तुम्ही किती गांभीर्याने घ्याचं ते ठरवा. त्यांना काहीतरी नवीन मसाला लागतो. त्यामुळे त्यांनी आता नवीन टून काढली असले. ती टून दोन दिवसांत बंद होईल”, अशी टीका भरत गोगावले यांनी केली.