Mumbai High Court : संमतीशिवाय महिलेच्या शरीराला हात लावणे हा गुन्हाच : मुंबई उच्च न्यायालय
न्यायाधीश मुकुंद सेविलकर यांच्या एकल खंडपीठाने 21 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशात परमेश्वर ढगे यांनी जालना सत्र न्यायालयाच्या 21 ऑगस्टच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देत याचिका निकाली काढली.
मुंबई : संमतीशिवाय एखाद्या पुरुषाने महिलेच्या शरीराला हात लावणे हा स्त्रीचा अपमान असून हा विनयभंगाचा गुन्हा असल्याचा निर्वाळा आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जालनातील एका केससंदर्भात निकाल देताना एका 36 वर्षीय पुरुषाची शिक्षेला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे.
न्यायाधीश मुकुंद सेविलकर यांच्या एकल खंडपीठाने 21 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशात परमेश्वर ढगे यांनी जालना सत्र न्यायालयाच्या 21 ऑगस्टच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देत याचिका निकाली काढली. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत त्या व्यक्तीला आयपीसी कलम 451 आणि 351-अ अंतर्गत दोषी ठरवले होते.
नेमकं काय आहे प्रकरण?
पीडितेने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 4 जुलै 2014 रोजी ती तिच्या आजीसोबत घरात एकटी होती. तिचा नवरा काही कामानिमित्त गावी गेला होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी तिच्या घरी आला आणि पती गावावरून कधी परतणार अशी विचारणा करू लागला. पीडितेने सांगितले की, तिचा नवरा रात्री घरी येणार नाही. यानंतर रात्री 11 वाजता हा व्यक्ती महिलेच्या घरात घुसला. पीडिता झोपली होती. अचानक कोणीतरी तिच्या पायाला हात लावत असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. ती तडक उठली आणि तिने पाहिले की तो व्यक्ती तिच्या खाटेवर बसला होता. पीडित तरुणी आणि तिच्या सासूने आरडाओरड केल्यानंतर तो पळून गेला. पीडितेने तातडीने फोन करून हा प्रकार पतीला सांगितला. सकाळी पती येताच पीडितेने संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.
दोषीच्या बाजूने वकिलांचा युक्तिवाद
‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, दोषी व्यक्तीच्या बाजूने, त्याच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद केला की, महिलेने घराचा दरवाजा आतून बंद केला नव्हता. यावरून त्याचा अशील महिलेच्या संमतीने घरात शिरला होता, असे सूचित होते. साधारणत: घरात पुरुष नसताना घरातील महिला नीट दार लावून घेतात. याशिवाय संबंधित व्यक्तीने कोणत्याही अश्लील हेतूने महिलेच्या पायाला हात लावलेला नाही, असा युक्तिवादही वकील प्रतीक भोसले यांनी केला. तक्रार दाखल करण्यास 12 तास उशीर झाल्याबद्दलही वकिलाने प्रश्न केला.
न्यायधीश काय म्हणाले?
सर्व युक्तिवाद आणि म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल देताना म्हटले की, ‘याचिकाकर्त्याने महिलेच्या इज्जतीला हात घालण्याचे काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात याचिकाकर्ता पीडितेच्या पायाजवळ बसलेला आढळून आला. एवढेच नाही तर पीडितेच्या कॉटवर बसून तो तिच्या पायाला हात लावत होता. या वर्तनातून अश्लील हेतू उघड होतात. अन्यथा, याचिकाकर्त्याने मध्यरात्री पीडितेच्या घरी अशाप्रकारे घुसण्यासाठी इतर कोणतेही कारण दिसत नाही.
आरोपी मध्यरात्री पीडितेच्या घरी का गेला याचे समाधानकारक उत्तर याचिकाकर्ता देऊ शकला नाही. पीडितेच्या पतीच्या गैरहजेरीचा फायदा घेत याचिकाकर्त्याने मुद्दाम अश्लील हेतूने घरात प्रवेश केला होता. त्यामुळे पीडितेच्या अब्रूवर हात घातल्याप्रकरणी ट्रायल कोर्टाने त्याला दोषी धरत कोणतीही चूक केली नाही, असे न्यायमुर्ती म्हणाले. (It is a crime to touch a woman’s body without her consent, mumbai high court said)
इतर बातम्या
गोहत्येचा संशय, सिनेस्टाईल पाठलाग करत टेम्पोवर कारवाई, सापळा रचून दोघांना पकडलं!