Sanjy Raut: सहमे-सहमे संजय राऊत? शिंदे सरकार स्थापनेपासून जहाल राऊत झाले मवाळ? पक्षप्रमुखांचीही साथ मिळेना?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन अनेक बंडखोर गेले असले तरी ठाकरेंना दुखावण्याची त्यांची तयारी दिसत नाही. अशा स्थितीत संजय राऊत हेही या बंडखोर आमदरांसाठी सॉफ्ट टार्गेट झाले आहेत. संजय राऊत या सगळ्यांच्या टीकेला उत्तरं देत असले तरी पक्षाकडून किंवा पक्षप्रमुखांकडून राऊतांचा बचाव करण्यासाठी कुणी पुढे येताना दिसत नाहीये.
मुंबई- एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचा बंडात सर्वाधिक आक्रमक असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), सध्या शिंदे बंडखोर आमदारांच्या टार्गेटवर आहेत. बंडखोरीच्या काळात अत्यंत जहाल भाषेत या बंडखोरांवर टीका करणारे राऊत सरकार स्थापनेनंतर थोडे मवाळ दिसू लागले आहेत. त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला ते उत्तर देत असले तरी ठाकरे यांच्या शिवसेना (Shivsena)पक्षातून कोणताही नेता किंवा पक्षप्रमुख या टीकेला उत्तर देताना दिसत नाहीये. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सक्रियपणे दिसलेले राऊत गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे घेत असलेल्या विभागप्रमुख, जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला उपस्थित होते का, याबाबत शंका उपस्थित करण्यात येते आहे. विधिमंडळ गटनेतेपदाची निवड, प्रतोदाची निवड या सगळ्या विधिमंडळ प्रक्रियेपासूनही ते थोडेसे लांबच दिसत आहेत. बंडखोर आमदारांवर कायदेशीर कारवाई होईल, असे त्यांच्याकडून आणि पक्षाकडून सांगण्यात येते आहे. मात्र बंडाच्या वेळी आक्रमक संजय राऊत एकदम बॅकफूटवर गेलेले, पक्षाकडूनही थोडेसे दुरावलेले आणि निराश भासत असल्याची चर्चा आहे.
बंडखोरांवर जहाल टीका
बंडखोरीच्या काळात अत्यंत जहाल भाषेत या आमदारावंर संजय राऊत यांनी टीका केली होती. रेडे, वराह, बळी, मृतदेह अशा उपमा संजय राऊतांकडून त्यांना देण्यात आल्या होत्या. एकनाथ शिंदेंसोबत असलेले अनेक बंडखोर आमदार आमच्या संपर्कात आहेत, ते महाराष्ट्रात आल्यावर ते आम्हाला येऊन मिळतील, विधिमंडळात बहुमत विश्वासाच्या वेळी वेगळे चित्र असेल असा दावा संजय राऊत सातत्याने करीत होते. मतदारसंघात कोणत्या तोंडाने जाल, शिवसैनिकांचा उद्रेक सहन करावा लागेल, अशी वक्तव्येही राऊत यांनी केली होती. त्यानंतर तोडफोड, पुतळे जाळणे यासारखे काही प्रकारही राज्यात घडले. इतकेच नव्हे तर या आमदारांना संजय राऊत यांनी रिक्षावाले, भाजीवाले या शब्दांत त्यांनी हिणवलेही होते. त्यानंतर एकनाथ शिंदे राज्यात परतले, त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्व बंडखोर आमदार राज्यात आले, विश्वासमत ठरावही झाला. बंडखोर आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात विनासुरक्षा फिरु लागल्यानंतर आता या बंडखोरांच्या टार्गेटवर राऊत दिसत आहेत.
बंडखोर आमदार हे राऊत यांच्याविरोधात
मतदारसंघात गेलेले बंडखोर आमदार एकपाठीमागून एक संजय राऊत यांना लक्ष्य करताना दिसत आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला गेला. राऊतांनीच शिवसेना संपवली, येत्या काळातही तेच पक्ष संपवतील अशी टीका होताना दिसते आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन अनेक बंडखोर गेले असले तरी ठाकरेंना दुखावण्याची त्यांची तयारी दिसत नाही. अशा स्थितीत संजय राऊत हेही या बंडखोर आमदरांसाठी सॉफ्ट टार्गेट झाले आहेत. संजय राऊत या सगळ्यांच्या टीकेला उत्तरं देत असले तरी पक्षाकडून किंवा पक्षप्रमुखांकडून राऊतांचा बचाव करण्यासाठी कुणी पुढे येताना दिसत नाहीये.
संजय राऊत यांच्या टीकेचा शिंदे, भाजपाकडून राजकीय आणि कायदेशीर वापर
बंडखोरीच्या काळात संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा राजकीय वापर सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार भावनिक पातळीवर करताना दिसत आहेत. वराह, बळी, मृतदेह यांचे उल्लेख विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री आणि इतर आमदारांनीही केला. इतकेच काय तर सुप्रीम कोर्टातही कशा प्रकारे धमक्या देण्यात येत असल्यासाठी राऊतांच्या वक्तव्यांचा दाखला सुप्रीम कोर्टातही देण्यात आला. विश्वासमत चाचणीबाबत सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत या वक्तव्यांचा राजकीय वापर करण्यात आला.
राऊतांकडून पवारांचे कौतुक, पवारांची भेट
पक्षाची सर्व धोरणे आणि निर्णय हे मातोश्रीवरुन ठरत असताना, हा रोष संजय राऊतांवर कसा, असा प्रश्न कदाचित त्यांनाही पडलेला असल्याची शक्यता आहे. या सगळ्या काळात संजय राऊत यांनी पक्षा वाचवण्यासाठी घेतलेली खंबीर भूमिका खरंतर कौतुकास्पद असतानाही, त्यांना सोसावी लागलेली टीका आणि त्याहीपेक्षा स्वपक्षीयांचे न मिळणारे समर्थन यामुळे ते निराश असल्याचे मानण्यात येते आहे. शरद पवार यांच्याशी त्यांच्या असलेल्या जवळकीचाही राजकीय वापर होत असल्याने त्याची खंतही त्यांना वाटते आहे. नाशिकच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वीही त्यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली. तसेच त्या पूर्वीच्या पत्रकार परिषदेतही शरद पवार हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असल्याचा पुनरुच्चार केला आहे. शिवसेना तिच्या कठीण काळात असताना, तिला सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या शिलेदाराला आणखी बळ मिळण्याची गरज व्यक्त होते आहे.