जयंतरावाच्या मुलाकडून आयफेल टॉवरवरून एका मुलीला प्रपोझ, आमची पोरं काय करतील याचा नेम नाही; पवारांच्या विधानाने खसखस
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आयकर, ईडीच्या कारवायांवर भाष्य केलं. लखीमपूरची हिंसा, मावळचा गोळीबार आणि महाराष्ट्र बंद यावरही भूमिका स्पष्ट केली. (jayant patil son Proposes to Girlfriend at Top of Eiffel Tower, says sharad pawar)
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आयकर, ईडीच्या कारवायांवर भाष्य केलं. लखीमपूरची हिंसा, मावळचा गोळीबार आणि महाराष्ट्र बंद यावरही भूमिका स्पष्ट केली. त्याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानाचीही खिल्ली उडवली. मात्र, या गंभीर पत्रकार परिषदेतील सुरुवात त्यांनी काहीशी हटके केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचा किस्साच पवारांनी सांगितला. जयंतरावाच्या मुलाने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोझ केला. दोघांचं जुळलं. पण आमची पोरं काय करतील याचा नेम नाही, असं शरद पवार यांनी सांगताच एकच खसखस पिकली.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वात आधी जयंत पाटील यांच्या मुलाची बातमी दिली. आमचे सर्व सहकारी आहेत. त्यातील एकाला आनंदाची बातमी द्यायाची आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवाची ही बातमी आहे. आमचा सर्वांचा दृष्टीकोण किती व्यापक झाला आहे बघा. जयंत पाटलांचे चिरंजीवांनी काल संध्याकाळी पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोझ केला. त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळवली. आता आम्ही वाळवास इस्लापूरपर्यंत सीमित नाही आहोत. आम्ही एकदम पॅरि सवगैरे जातो. ठिकाणं इंटरनॅशनल असेल. पण दोन्ही मुलं मुली डोमेस्टिक आहेत. स्थानिक आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न इथंच होईल, असं सांगतानाच आता आम्हाला काळजी घ्यावी लागेल. आमची मुलं कुठं जाऊन काय करतील हे सांगता येत नाही, असं पवार म्हणाले. पवारांच्या या विधानानंतर एकच खसखस पिकली.
अजीर्ण होईल इतका पाहुणाचार घेऊ नये
दरम्यान, यावेळी पवारांनी आयकराच्या धाडीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. पाहुणे हा शब्द वापरला हे चांगलं केलं. हा शब्द मी कॉईन केला होता. मी बोलेल पण त्यांची चौकशी झाल्यावर बोलेल. वस्तुस्थिती सांगेल. ती चौकशी सुरू आहे. केंद्रातील काही अधिकाऱ्यांकडून काही माहिती घेतली. पाहुणे येतात. अनेक ठिकाणी येतात. एक दिवस असतात, दोन दिवस असतात, तीन दिवस असतात, आजचा सहावा दिवस आहे. पाहुणाचार घ्यावा, पण अजीर्ण होईल इतका पाहुणाचार असू नये, असं पवार म्हणाले.
माझ्या घरातील मुलींची त्यांनी आठवण केली. या तिन्ही मुलींचा कारखाना नाही. एक पब्लिकेशनमध्ये आहे. एक डॉक्टर आहे. तिसरी गृहिणी आहे. त्यांचा या सर्वांशी संबंध नाही. ठिक आहे तिकडे गेले चौकशी केली. एक दीड दिवसात चौकशी केली. त्यांनाही जायची घाई होती. पण त्यांनाही सारखे फोन येत होते. थांबा म्हणून सांगितलं जात होतं. अजून घर सोडू नका. आमच्या मुलींनी विचारलं, दोन दिवस झाले… तीन दिवस झाले… तुमच्या घरचे वाट पाहत असतील. त्यांनी सांगितलं आम्हाला जायचंय, पण आम्हाला सूचना आहेत की आम्ही सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही. त्यामुळे पाच दिवस झाल्यावर काहीजणांनी घर सोडले. आज सहाव्या दिवशीही दोन तीन ठिकाणी पाहुणे आहेत, असं त्यांनी सांगितलं.
सत्तेत असल्याचं स्मरण राहणं कधीही चांगलं
पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो, असं सांगतानाच सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो, असा सल्लाही पवार यांनी दिला.
संबंधित बातम्या:
तपास यंत्रणेकडून देशमुखांच्या घरी पाचवेळा छापा मारण्याचा विक्रम, शरद पवारांचा घणाघाती हल्ला
फडणवीसांकडून मावळ गोळीबाराची आठवण, आता पवारांनी मावळातील वस्तुस्थितीच माडंली!
(jayant patil son Proposes to Girlfriend at Top of Eiffel Tower, says sharad pawar)