‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’, अजित पवारांच्या स्पष्टीकरणाला आव्हाडांचं खोचक उत्तर
अजित पवार यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी अजित पवारांवर खोचक शब्दांत टीका केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी आज ट्विटवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई | 5 जानेवारी 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात केलेल्या एका वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात वाद सुरु आहे. अजित पवार यांनी भाषण करताना कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की, शेवटची निवडणूक आहे असं सांगतील आणि भावनिक आवाहन करतील. पण तुम्ही त्याला बळी पडू नका. तसेच शेवटची निवडणूक कधी येईल हे मला माहिती नाही, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली होती. “ज्या माणसाने तुम्हाला राजकारणात आणलं, ज्यांनी तुम्हाला मांडीवर बसवलं त्या शरद पवारांचे शेवटचे भाषण म्हणताय. म्हणजे तुम्हाला पाषाण हृदयी ही म्हणता येणार नाही. पाषाणालाही पाझर फुटतो. पण तुम्हाला माया, आपुलकी काहीच राहिलेली नाही. तुम्ही भावनाशुन्य झाला आहात”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
“शरद पवारांचे मरण ही तुमची इच्छा आहे आणि त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसतेय. तुम्ही त्यांचा किती द्वेष करता हे मी फार पूर्वीपासून बघितलंय”, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यांच्या याच टीकेला आज अजित पवार यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं. तसेच ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’, असं जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना सुनावलं.
अजित पवार काय म्हणाले?
“काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे”, असं अजित पवार ट्विटरवर म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर काय?
नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात. साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले जाऊ द्या कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती आणि हो… https://t.co/jdukapOz5L
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 5, 2024
“नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा कशाला करता आहात? शरद पवारांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला? हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले. जाऊ द्या कधीतरी खरा चेहरा बाहेर येतोच. नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती. आणि हो कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते”, असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.