‘पुण्यात गुंडांना कंत्राट’, जितेंद्र आव्हाड अजित पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता खोचक टीका केली आहे. "पुण्यात स्क्रॅपचे कंत्राट आणि लेबर सप्लायरचे कंत्राट हे फक्त गुंड लोक घेत आहेत", असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. "एवढे दिवस आमच्या बापाचं तोंड बघून गप्प बसलो होतो. पण आता नाही", असंही ते यावेळी म्हणाले.
मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे पुण्यातील विकासकामांकडे त्यांचं विशेष लक्ष असतं. अजित पवार यांनी त्यांचं पुण्याविषयी असलेलं प्रेम अनेकदा व्यक्तही केलं आहे. असं असलं तरी अजित पवार यांच्यावर एकेकाळी त्यांचेच सहकारी असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. “स्वतःला पुण्याचे जे अनभिषिक्त सम्राट आहेत ना, त्यांचा हात हा पुण्यातील उद्योग क्षेत्रात आहे. आज मी टीका करणार. एवढे दिवस आमच्या बापाचं तोंड बघून गप्प बसलो होतो. पण आता नाही. स्क्रॅपचे कंत्राट आणि लेबर सप्लायरचे कंत्राट हे फक्त गुंड लोक घेत आहेत. जो नेता हे कंत्राट देतो त्यांच्यामागे जाऊन हे उभे असतात”, असं मोठं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
“समोर किती संख्या आहे याला काही महत्त्व नाही. लढलं पाहिजे. लढाईला अशीच सुरुवात होते. आपण भीमा कोरेगावचे सैनिक आहोत. ऑर्गनायझर हे संघाच मुखपत्र आहे. यांनी कधी तिरंगा आपल्या मुख्यालयात लावला नाही. ते आत्ता घरघर तिरंगा कार्यक्रम हाती घेत आहेत. यांना यूजीसीच्या माध्यमातील आरक्षण घालवायचं आहे. हे संविधान सर्वसमावेशक आहे. मतदानाचा अधिकार हा लढाईचा मार्ग आहे. त्यामुळे या मतदानातून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. इंग्लडमध्ये महिलांना मतदान करण्याचा निर्णय आपल्यानंतर झाला आहे. आपल्या संविधान निर्मात्याने कधी आपल्याला मतदानचा अधिकार दिला आहे हे तुम्हाला माहीत आहे ना?”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘व्हिडीओ क्लिप बाहेर येतातच कसे?’
“टी राजा हा आंध्रप्रदेशचा आमदार आहे. तो मीरा भाईंदरमध्ये आला होता. तेव्हा तो तिथे काय बरळून गेला, असेच काही अनेक आमदार आहेत ते शिव्या घालतात. त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. पोलीस ठाण्यात गोळीबार होत आहेत. त्याचे वीडियो क्लिप बाहेर येत आहेत. हे व्हिडीओ क्लिप बाहेर येतातच कसे?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाच.
“आत्ता पक्ष फोडण्याचं काम सुरु आहे. आमचा पक्ष फुटला. त्यात आम्ही आमच्यातील काही लोकांना मी दोषी ठेवतो. वरतून हेच बोलले की, शरद पवार हुकूमशहा आहे म्हणून आणि हाच नेता तुम्ही सकाळी 7 वाजता भेटायला गेला तर ते भेटत होते. मग तेव्हा हुकूमशाह नव्हते का?”, असा सवाल आव्हाड यांनी केला. “मिशनरी सिस्टमने मेडिकल आणि शिक्षण क्षेत्रात खूप काम केलं आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. मी स्वतः मिशनरी शाळेत शिकलो”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.