आव्हाडांकडून तुतारी वाजवून चॅलेंज पूर्ण, मिटकरींचा 1 लाखांचा चेक तयार, पण…
अमोल मिटकरी यांनी दिलेलं चॅलेंज जितेंद्र आव्हाड यांनी पूर्ण केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज तुतारी वाजवून दाखवली आहे. त्यामुळे आता अमोल मिटकरी यांनी 1 लाख देवून दाखवावे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेलं चॅलेंज शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पूर्ण केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज तुतारी वाजवून दाखवली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवल्यास आपण 1 लाख रुपये बक्षीस देऊ, असं चॅलेंज अमोल मिटकरी यांनी दिलं होतं. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आज रायगडावर त्यांच्या पक्षाच्या नव्या चिन्हाच्या अनावरणाच्या कार्यक्रमात तुतारी वाजवली. आपण आता चॅलेंज पूर्ण केलं. अमोल मिटकरींनी एक लाखांचा चेक द्यावा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तर मिटकरी यांनी आव्हाडांना एकट्याने तुतारी वाजवावं, असं चॅलेंज दिल्याचं ते म्हणाले. आपण पराभूत झाल्यास एक लाखाचा चेक देण्यास तयार असल्याचंदेखील ते म्हणाले आहेत.
विशेष म्हणजे अमोल मिटकरी यांनी 1 लाख रुपयांचा चेक देखील बनवला आहे. पण त्यांनी चेकमधील तपशील चुकवला आहे. त्यांनी पुन्हा जितेंद्र आव्हाडांना चॅलेंज दिलं आहे. “जितेंद्र आव्हाड यांचं पोट पुढे आलेलं आहे. मागचे तुतारीवादक तुतारी वाजवत आहेत. आव्हाडांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे. माझा 1 लाख रुपयाचा चेक त्यांच्या नावे तयार आहे. महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 तारखेपासून मुंबईत विधान भवनात पार पडत आहे. त्यांनी पहिल्या दिवशी स्वत: तुतारी आणावी. पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा एक लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांकडून, ज्याला अजित पवार यांनी 50 हजार रुपये महिन्यावर ठेवल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणतात, त्यांनी माझा दोन महिन्याचा पगार घेऊन जावा”, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आलं आहे. या चिन्हाचा अनावरणाचा कार्यक्रम आज रायगडात पार पडला. हे चिन्ह मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली होती. शिवरायांना नमन करुन तुतारी वाजवत, रायगडावरुन सुरुवात करणार. दिल्लीच्या तख्ताला भीती वाटणारा तुतारीचा आवाज असेल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. “एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन जी मी स्वप्राणाने… आमचं जितेंद्र आव्हाड यांना चॅलेंज आहे, त्यांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी, आपल्याकडून 1 लाखाचं बक्षीस घेऊन जावं. फक्त अट अशी आहे, आवाज तुतारीतून आला पाहिजे. तुतारीला कालपासून मार्केट आहे. पण हरकत नाही. विषारी तुतारी वाजवायला माणूस आहे”, असं चॅलेंज अमोल मिटकरी यांनी दिलं.
अमोल मिटकरी यांच्या या चॅलेंजनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आज रायगडावर हे चॅलेंज पूर्ण केलं. पण अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवली नसल्याचाच दावा केला. त्यांनी आव्हाडांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांसमोर तुतारी वाजवून दाखवावी, असं नवं चॅलेंज अमोल मिटकरी यांनी दिलं. तसेच आला चेक तयार असल्याचंदेखील ते म्हणाले आहेत.