महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच भूकंपाचे संकेत? जितेंद्र आव्हाड यांचं त्यांच्या अटकेच्या दाव्यावर सविस्तर स्पष्टीकरण
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या अटकेच्या दाव्यावर सविस्तर भूमिका मांडली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जिंतेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी गेल्या आठवड्यात आपल्याला कधीही अटक होऊ शकते, असा दावा केला होता. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ठाण्याच्या नगरसेवकांच्या बोलावलेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अटकेबद्दल केलेल्या दाव्यावर आज स्पष्टीकरण दिलंय. आव्हाडांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या अटकेच्या दाव्यावर सविस्तर भूमिका मांडली. “जे मला प्राप्त परिस्थिती दिसतेय, त्यावरुन मला अटक होऊ शकते असं मी बोलतोय. माझ्यावर कलम 354 गुन्हा दाखल झालाय. पण कोर्टाने तो गुन्हा खोटा ठरवलाय. मला वाटतं जेव्हा दोन गुन्हे पडले तेव्हा कसे पडले होते ते तुम्हाला माहिती आहे का?”, असा सवाल त्यांनी केला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांवर आरोप केला.
“माझ्यावर सर्वोच्च न्यायालयात एक केस दाखल केली होती. त्यामध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर करायचं होतं. त्या प्रतिज्ञापत्राला महत्त्व प्राप्त करुन देण्यासाठी दोन दिवसांत दोन केस दाखल केल्या. नंतर ते प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यामध्ये हा सराईत गुन्हेगार आहे, दोन महिन्यात याच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत, असं प्रतिज्ञापत्र पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलं”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“विशेष म्हणजे माझ्यावर प्रकरणच नाहीय. असे खोटे गुन्हे करुन काहीतरी कारण काढून फसवायची कामे चालू आहेत. गुन्हाच केला नव्हता”, असं आव्हाड म्हणाले.
“1932 क्रिमिनल अॅमेंटमेंट अॅक्ट सेक्शन 7 हा अस्तित्वातच नाहीय. त्यांना 41 ‘अ’ नोटीस द्यावी लागते. न्यायाधीशांनी लिहिलंय की, हे कुठल्याही पोलिसांनी पाळलेलं नाही. त्यामुळे ‘नो केस’ असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यांनी कलम 354 गुन्हावरही there is no case, hence bail granted असं कोर्टाने म्हटलं आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
“बेल ऑर्डरमध्ये जजला कारण द्यावं लागतं. जजचं कारण महत्त्वाचं असतं. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल ही तेच सांगितलं. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, पण ज्या दोघांनी सत्य सांगितलं त्यावर विश्वास ठेवला नाही, त्यामुळे बेल दिली. संजय राऊत यांच्याबद्दलही तेच झालं”, असा दावा आव्हाडांनी केला.
“FIR करणं खूप सोपं असतं. कारण सुप्रीम कोर्टात ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार यांच्या केसमध्ये लिहिलं आहे. जो कुणी येईल, त्याने सांगितलं तर तुम्हाला FIR नोंदवायचा आहे. पण त्यानंतर मला अटक करण्याची गरज नव्हती”, असं आव्हाड म्हणाले.़
‘अटक होईल म्हणून राष्ट्रवादीची बैठक झाली नाही’, जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण
“राष्ट्रवादीची बैठक जितेंद्र आव्हाड यांना अटक होईल, यासाठी झाली नाही. राष्ट्रवादीची बैठक ही सगळ्या नगरसेवकांना बोलावून प्राप्त परिस्थिती काय आहे? काय घडू शकतं? याबद्दल चर्चा झाली. ती बैठक पक्षाची राजकीय बैठक होती. या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चर्चा केली”, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
“या बैठकीत चर्चा झाली की, कदाचित एखादं प्रकरण काढून ठाण्यापासून जितेंद्र आव्हाडांना लांब ठेवावं म्हणून हे घडू शकतं. त्यांनी एक शक्यता व्यक्त केली. ती बैठक माझ्यासाठी बोलावली नव्हती. नगरसेवक जाणार-येणार याविषयी चर्चा करण्यासाठी बोलावली होती”, असं आव्हाडांनी सांगितलं.
“ठाण्याचे पाच-सहा नगरसेवक जातील, अशी चर्चा आहे. ते खरं असू शकतं. सध्या खोक्याचं वारं चालू आहे. त्यामुळे खोका आणि बोका हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं सार आहे”, असं आव्हाड म्हणाले.