मुंडेसाहेब, भुजबळसाहेब, पवारसाहेब होते म्हणून…; आव्हाडांनी मांडला ओबीसी आरक्षणाचा इतिहास?
गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांनी रान उठवलं म्हणून ओबीसींचं आरक्षण थोडं तरी टिकलं आणि शरद पवारसाहेबांसारखा भक्कम नेता ओबीसींच्या मागे उभा राहिला म्हणून या आरक्षणाला बढती मिळत गेली.
मुंबई: गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांनी रान उठवलं म्हणून ओबीसींचं आरक्षण थोडं तरी टिकलं आणि शरद पवारसाहेबांसारखा भक्कम नेता ओबीसींच्या मागे उभा राहिला म्हणून या आरक्षणाला बढती मिळत गेली, असं सांगतानाच आता हे सगळंच हातातून गेलं आहे, अशी खंत गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी संवाद साधताना ही खंत व्यक्त केली. बिहारची ओबीसी चळवळ ऐतिहासिक आहे. महाराष्ट्रातही ती ऐतिहासिक आहे. बिहारमध्ये ती आक्रमक असल्यामुळे अनेक वर्ष सत्ता ओबीसींच्या हातात राहिली. तसं महाराष्ट्रात झालं नाही. इथे मुंडे साहेब, भुजबळ साहेब यांनी रान उठवलं म्हणून थोडं तरी टिकलं आणि पवारसाहेबांसारखा भक्कम नेता ओबीसींच्या मागे उभा राहिला. त्यांच्या आरक्षणासाठी सत्ता येईल, जाईल, मते मिळतील नाही मिळतील तरी ते उभे राहिले. त्यांनी राजकीय, शैक्षणिक आणि नोकऱ्यातील आरक्षण ओबीसींना दिलं. आता ते सगळंच गेलं हातातून, असं आव्हाड म्हणाले.
माझ्या वारसासाठी बडबड करत नाहीये
मी मागासवर्गीय आहे. माझ्या मुलीने कधी आरक्षणाचा फायदा घेतला नाही. माझी बायको कधी निवडणुकीला उभी राहणार नाही. माझी पोरगी निवडणुकीला उभे राहणार नाही. माझ्या घरात या दोघीच आहेत. या दोघींना राजकारणात काहीही इंटरेस्ट नाही. त्यामुळे मी जे काही बडबडतोय ते माझ्या वारसदारासाठी बोलत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
खुल्या गटातून ओबीसी निवडणून येईल काय?
यावेळी त्यांनी कळीचा प्रश्न उपस्थित केला. खुल्या जागेतून एखादा मागासवर्गीय निवडून येऊ शकतो का हो?, असा सवालच त्यांनी विचारला. खुल्या जागेतून ओबीसी निवडून येऊ शकत नाही. याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. उगाच माझ्या नावाने टाहोफोडून काही होत नाही. आज महाराष्ट्रात मंत्रालय किंवा जिल्हा परिषदेतील जेवढे ओबीसी आहेत, त्यांचे आरक्षण गेले. त्यांच्या प्रगतीचे दरवाजे बंद झाले. आता… आता त्यावर कोणी बोलत नाही. प्रत्येकजण आपल्या समाजा पुरते बोलत आहेत. एका जातीपुरतं बोलू नये. 352 जाती आहेत. आणि जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा देशातील साडेतीन हजार जातींचं प्रतिनिधीत्व तुम्हाला करावं लागेल. हे मर्यादित नाहीये, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
हे काय चालू आहे?
यशवंतराव चव्हाणांनी आधी चार टक्के आरक्षण दिलं. नंतर वसंतराव नाईकांनी दहा टक्के आरक्षण दिलं. हा हा पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा आहे. तो जपायला हवा. उगाच कुणाच्या तरी अंगावर जायचं… मला काही कळतच नाही… आंदोलन कुठे? माझा पुतळा जाळा. माझ्याविरोधात मोर्चा काढा. कलेक्टर ऑफिसला निवेदन द्या. दरवेळेस घरावर आंदोलन करणं हा नवीन प्रकार कधीपासून सुरू झाला? मी 35 वर्ष राजकारणात आहे. माझ्या एवढी आंदोलनं राज्यात कोणी केली नसेल. पण मी कधी कुणावर पर्सनल अटॅक केला नाही. कुणाच्या घरावर चालू नाही गेलो. कुणी एकटा चालला असेल तर त्याला गोळ्या नाही घातल्या. हे काय चालू आहे?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
मी घरात कधीच नसतो. मग माझ्या घरावर जाऊन काय प्राप्त होणार होतं. ही स्टंटबाजी असते. पॉलिटिकल स्टंट आहे. खरंतर भाजपने माझ्या घरच्यांची माफी मागायला हवी. त्यांचा काय दोष? त्यांना घरात स्वत:ला कोंडून घ्यावं लागतं. का असं करता? मी लढायला तयार आहे. मैदानात आहे ना… मी माझा एक टक्का शब्दही मागे घेतलेला नाही. पण हा इतिहास तर जाणून घ्या, असं आवाहनही त्यांनी केलं.
संबंधित बातम्या:
OBC Reservation: 11 लाखांची ताकद रस्त्यावर उतरली असती तर… जितेंद्र आव्हाडांची नेमकी खंत काय?