Jitendra Awhad on Raj Thackeray: टिळकांनी निधी जमवला, पण शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार नाही; आव्हाडांनी दाखवला आरसा
Jitendra Awhad on Raj Thackeray: ब्रिटीश आणि शिवाजी महाराज जीर्णोद्धार समितीने मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1926 साली केला.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळक यांनी बांधली असा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. टिळकांनी शिवाजी महाराजांची समाधी बांधली हे धांदात खोटं आहे. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली. तेव्हा टिळक 13 वर्षाचे होते, असा दाखला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी दिला आहे. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गॅझेटचा दाखला देऊन राज यांचा दावा खोडून काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी संभाजी महाराजांनी बांधून ठेवली होती. नंतर ती दुर्लक्षित झाली. लोकमान्य टिळकांनी या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी समिती स्थापन केली होती. त्यासाठी निधीही जमा केला. पण जीर्णोद्धार केला नाही, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या गॅझेटमधील पत्राच्या आधारे सांगितलं.
जितेंद्र आव्हाड यांनी हे पत्रं ट्विट केलं आहे. ब्रिटीश आणि शिवाजी महाराज जीर्णोद्धार समितीने मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1926 साली केला. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही खरी संभाजी महाराज यांनी बांधून ठेवली होती. पण ती नंतर दुर्लक्षित करण्यात आली, असा या पत्रातील मजकूराचा दाखला देत आव्हाड यांनी राज यांना हे पत्र व्यवस्थित वाचण्याचा सल्लाही दिला.
टिळकांनी समाधी बांधली नाही
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते कि लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते. पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही, असंही आव्हाड यांनी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते कि लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही. pic.twitter.com/YMKjxmDILm
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 2, 2022
टिळकांचे योगदान नाही
या विषयावर प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारात लोकमान्य टिळकांचे योगदान नाही. समाधी जीर्णोद्धारासाठी टिळकांनी पैसे जमा करून आपल्याच बँकेत ठेवले. नंतर ही बँक बुडाली असं सांगितलं गेलं. या पैशांचा अपहार झाल्याचे दाखले इतिहासात आहेत. जीर्णोद्धारासाठी टिळकांनी शाहू महाराजांनाही पत्रव्यवहार केला होता, असा दावा इंद्रजीत सावंत यांनी केला. तसेच त्यांनी हे पत्रं समोर आणलं आहे. राज ठाकरे यांचा अभ्यास कमी आहे. त्यांनी माहिती घेऊन विधानं करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
पेशव्यांनीही समाधीकडे दुर्लक्ष केलं
3 एप्रिल 1680 शिवाजी महाराज यांचे निधन झाले. त्यांनंतर संभाजी महाराज यांनी त्यांची समाधी बांधली. नंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. त्यानंतर पेशव्यांनी हा जिंकला. 1773 ते 1818 पर्यंतच्या इतिहासात समाधीचा उल्लेख कुठेही नाही. पेशव्यांनी सुद्धा समाधीकडे दुर्लक्ष केले असे इतिहास सांगतो, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
टिळकांनी एक खडा सुद्धा बसवला नाही
महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी 1869 साली शोधली. पहिली शिवजयंती फुले यांनी साजरी केली. त्यावेळी टिळक केवळ 13 वर्षांचे होते. टिळकांनी सुद्धा समाधी चांगली बांधावी यासाठी फंड काढला. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी या नावाने निधी गोळा केला. पण उभ्या हयातीत टिळकांनी एक खडा सुद्धा बसवला नाही.1926 ला इंग्रजांच्या फॉरेस्ट समितीने टिळकांना पत्र लिहून निधींचे काय झाले विचारले. ज्या बँकेत पैसे ठेवले होते ती बँकच बुडाली असं टिळकांनी कळवलं. त्यानंतर इंग्रजांनी समाधीचा चौथरा आणि छत्र बांधले. राज का चुकीचे बोलत होते कळले नाही. दिल्लीत नेहरू, गांधी यांना बाजूला सारून नवा इतिहास दाखविला जातोय. इथेही फुले, शाहू, आंबेडकर यांना बाजूला सारून इतिहास लिहिला जातोय का? असा सवालही भुजबळ यांनी केला.