‘इथे बापाला घराच्या बाहेर ढकलून…’, अजित पवार गटाच्या आंदोलनावर आव्हाडांचं ट्वीट
अजित पवार यांच्या गटाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवर प्रत्युत्तर दिलं आहे. "इथे आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत", अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.
मुंबई | 3 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. उपमुख्यमंत्री अजित पवार गट यावरुन चांगलाच आक्रमक झाला. अजित पवार गटाचे कार्यकर्ते ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर गेले. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर रामाची आरती म्हणत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळासाठी तणावाचं वातावरण होतं. या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.
“माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्रीरामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्रीरामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्रीरामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले होते, त्यामुळे भरत यांना म्हणजेच आपल्या बंधूला सिंहासन देण्यासाठी चौदा वर्षे वनवास भोगला. पण, सम्राट भरत यांनी श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘इथे बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत’
“इथे आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत. मात्र, आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत म्हणून यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही. आम्ही यांचा प्लॅन हानून पाडू. तेव्हा आधी इतिहास समजून घ्या, श्रीराम आईवडिलांना मानायचे. तुमचे नेते आईवडिलांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर घालवताहेत”, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर संबंधित परिसर गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं. अजित पवार गटाने तिथे रामाची आरती करुन वेगळ्या प्रकारे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी ती जागा गोमुत्र आणि गंगाजल टाकून शुद्ध केली.