‘तीन पोरं होती, माझ्या पोलिसांकडे 4 रिव्हॉल्वहर आणि 24 गोळ्या होत्या’, हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड असं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर आज तीन तरुणांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वाराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे यांच्यावर सडकून टीका केली. यापुढे आपण संभाजीराजेंना अहो जाओ असा मान देऊन बोलणार नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी सुरुवातीला म्हटलं. तसेच “हल्ला करणारे तीन पोरं होती. माझ्या पोलिसांकडे 4 रिव्हॉल्वहर होते, 24 गोळ्या होत्या”, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. “यापुढे मी तुम्हाला म्हणणार नाही. मी तुला म्हणेन. कारण ही लढाई विचारांची आहे. तुम्ही ज्या विचारांवर जात आहात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते. हे तुमच्या वडिलांचे सुद्धा विचार नाहीत. एखाद्या मुलाने आपल्या वडिलांचे विचार खोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधी घडलं नसेल. वडिलांनी तुमचा निषेध करणं हे बेदखल करण्यासारखं आहे”, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“मी तर पुढे बसलो होतो. मला फक्त आवाज आला की, गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला. पुढे जाऊन थांबलो. तोपर्यंत हे उलटे फिरले. तीन पोरं होती. माझ्या पोलिसांकडे 4 रिव्हॉल्वहर होते, 24 गोळ्या होत्या. चार पोलीस होते. या असल्या भ्याड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षतावर काही फरक पडणार नाही. मी मुसलमानांसाठी लढत नवसतो तर मी विषयावर लढत होतो. गजापूरमध्ये तुम्ही मशिद तोडलीत. पण तिथे फक्त मुसलमान राहत नाहीत. तर तिथे हिंदू देखील राहतात. तिथे हिंदू 80 टक्के राहतात. तिथे सगळे सण एकोप्याने साजरी केले जातात. ही कोल्हापूरची परंपरा आहे”, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.
‘त्यांना वाटत असेल की, गाडीवर मला दगड मारला तर मी बोलणार नाही’
“कोल्हापूरच्या एका पौराणिक मशिदीबाहेर गणपतीची मूर्ती आहे. ही सामाजिक एकदा शाहू महाराजांनी जपली होती. ती सामाजिक एकता या घराण्याने जपायला पाहिजे होती. कुणाचा तरी बोलका बाहुला म्हणून हा बोलला आणि सर्व परिस्थिती हाताबाहेर गेली. त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला. संभाजी भिडे याने जे करायचं होतं ते काम करुन टाकलं. त्यांना वाटत असेल की, गाडीवर मला दगड मारला तर मी बोलणार नाही. पण मी आता अजून तीव्रतेने बोलेन. मी आजपर्यंत तरी अहो जाओ करायचो”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘सगळ्या पक्षांच्या दरवाज्यात तुम्ही जावून आलात’
“तुम्ही विचारांनी चुकलात. तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडले. तुम्ही रक्ताचे वारसदार आहात. आम्ही विचारांचे वारसदार आहोत. अहो स्वत:च्या वडिलांनी तुम्हाला बेदखल करुन टाकलं. स्वत:च्या वडिलांनी तुमचा निषेध केला. त्यामागील खरं राजकारण हे आहे की, तुमच्या मनामध्ये आग आहे, तुम्ही जळताय की, तुमचे वडील खासदार झाले आहेत. तुम्हाला खासदारकीचं तिकीट हवं होतं. सगळ्या पक्षांच्या दरवाज्यात तुम्ही जावून आलात, त्यांनी तिकीट न दिल्यामुळे आणि आपले वडील खासदार झाले यातून तुम्हाला जी आघ लागली आहे, त्यातून तुम्ही हे बेताल वक्तव्य करत आहात आणि बेताल वागत आहेत. मी आज महाराष्ट्राला सत्य सांगितलं आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.