संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख राहिला; कालनिर्णयचा खुलासा काय?
छपाई झालेल्या कॅलेंडरमध्ये सुधारणा करता येणार नाही. पण प्ले स्टोअर अॅपमध्ये तुमचं कॅलेंडर आहे. कमीत कमी त्यात तुम्ही बदल करू शकता.
मुंबई: राज्यात महापुरुषांच्या अवमानावरून वादंग सुरू असून त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारमधील मंडळीच हा अवमान करत असल्याने त्याविरोधात विरोधकांनी उद्या महामोर्चाचं आयोजन केलं आहे. एकीकडे हा वाद सुरू असतानाच कालनिर्णयच्या दिनदर्शिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा उल्लेख राहून गेला आहे. मात्र, ही चूक लक्षात येताच कालनिर्णयने तात्काळ खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
कालनिर्णयने त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा खुलासा केला आहे. कालनिर्णय 2023च्या आवृत्तीमध्ये 16 जानेवारी रोजी असणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचा उल्लेख करण्याचे राहून गेले आहे. या पुढील कालनिर्णयच्या उर्वरित सर्व प्रतींमध्ये तसेच या पुढील सर्व आवृत्त्यांमध्ये हा उल्लेख केला जाईल.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आम्हाला अतीव आदर आहे. छत्रपती संभाजी महाराजप्रेमींच्या भावना अनवधानाने दुखावल्या गेल्या असल्यास आम्ही मनापासून दिलगीर आहोत, असा खुलासा कालनिर्णयने केला आहे.
— Kalnirnay (@Kalnirnay) December 15, 2022
कालनिर्णयकडून हा तात्काळ खुलासा करण्यात आला आहे. तसेच कालनिर्णयने ही चूक पुन्हा न करण्याची हमीही दिली आहे. कालनिर्णयच्या या खुलाश्याला अनेकांनी लाईक्स केलं आहे. तसेच अनेक कमेंट्सही केल्या आहेत. अनेकांनी काही सूचनाही केल्या आहेत.
छपाई झालेल्या कॅलेंडरमध्ये सुधारणा करता येणार नाही. पण प्ले स्टोअर अॅपमध्ये तुमचं कॅलेंडर आहे. कमीत कमी त्यात तुम्ही बदल करू शकता, असा सल्ला काहींनी दिला आहे. तर काहींनी कालनिर्णय घेणं बंद करत असल्याचं सांगत मोबाईलमधून अॅप डिलीट करत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींना ही जाणीवपूर्वक केलेली चूक वाटते.