कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरोधात लढण्यास ठाकरे गटातील बड्यांचा नकार, आता आयात उमेदवार देण्याची वेळ
shrikant shinde, uddhav thackeray: मतदारसंघांतील अनेक बडे पदाधिकारी आणि नेते कल्याणमधून निवडणूक लढण्यास नकार देत आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मतदारसंघांबाहेरच्या उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक वरुण सरदेसाई यांच्यासह सुषमा अंधारे यांची नावे चर्चेत होती.
लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज २७ मार्चपर्यंत दाखल करण्यात येणार आहे. परंतु अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटप निश्चित झाले नाही. परंतु काही इच्छूक उमेदवारांचे तिकीट निश्चित असल्यामुळे त्यांनी प्रचार सुरु केला आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित आहे. यामुळे त्यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे येणार आहे. परंतु ठाकरे गटाला या ठिकाणी उमेदवारच मिळत नाही. यामुळे कल्याण लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राविरुद्ध ठाकरे गटाला उमेदवार आयातीची वेळ आली आहे. कारण अनेक बड्या नेत्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.
बड्या नेत्यांकडून निवडणूक लढवण्यास नकार
मतदारसंघांतील अनेक बडे पदाधिकारी आणि नेते कल्याणमधून निवडणूक लढण्यास नकार देत आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मतदारसंघांबाहेरच्या उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक वरुण सरदेसाई यांच्यासह सुषमा अंधारे यांची नावे चर्चेत होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने आता ठाण्यातील केदार दिघे यांचे नाव चर्चेत आले आहे. आता केदार दिघे उमेदवारी करणार का? हा विषय आहे.
श्रीकांत शिंदे यांचा आक्रमक प्रचार
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरोधात विरोधकांना उमेदवार मिळत नाही. त्याचवेळी श्रीकांत शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या बैठका, प्रचार सभा सुरु झाल्या आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी देशात चारशे पार तर महाराष्ट्रात 45 पार या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जात असल्याचे म्हटले आहे. येत्या निवडणुकीत कोणाला मत द्यायचं आहे, हे लोकांनी ठरवलं आहे. महायुतीचे उमेदवार निवडून येतील व पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व करतील, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
कल्याण बदलतोय- श्रीकांत शिंदे
कल्याणमधील झालेल्या विकास कामांमुळे लोकं समाधानी आहेत. कल्याण बदलत असून कात टाकतेय, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. मला 2014 मध्ये अडीच लाखांच्या मताधिक्य होते. 2019 मध्ये साडेतीन लाखांचं मताधिक्य होते. यंदा विक्रमी मताधिक्याने लोक निवडून देणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले .