मुंबई: कोणीतरी केतकी चितळे (Ketaki Chitale) नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असं मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रक काढून म्हटलं होतं. केतकी चितळेला राज ठाकरे ओळखत नसल्याचंच या पत्रातून ध्वनीत होत होतं. मात्र, राज ठाकरे यांचा केतकीसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. राज ठाकरे यांच्या हातावर केतकी बँड बांधत असल्याचं या फोटोतून दिसत आहे. 2019मधील हा फोटो आहे. त्यामुळे राज ठाकरे हे केतकीला ओळखत असल्याचं दिसून येत आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर कमेंटचा पाऊसही पडत आहे.
अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वच राजकीय पक्षाने या पोस्टवर निषेध नोंदवला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या पोस्टवर टीका करत त्याचा निषेध नोंदवला आहे. राज यांनी एक पत्रक काढून ही टीका केली आहे. या पत्रात त्यांनी कोणी तरी केतकी चितळे नामक व्यक्ती असा केतकीचा उल्लेख केला आहे. त्यातून राज ठाकरे हे केतकीला ओळखत नसल्याचं ध्वनीत होत आहे. मात्र, राज यांच्या पत्रानंतर लागलीच राज आणि केतकीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत केतकी राज यांना कसला तरी बँड बांधताना दिसत आहे. त्यामुळे सध्या या फोटोची चर्चा रंगली आहे.
21 जून 2019मध्ये केतकी ही राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी गेली होती. केतकीला एपिलेप्सी नावाचा आजार होता. ती या आजाराशी लढत होती. तसेच एपिलेप्सीबाबत जनजागृतीही करत होती. तिच्या धाडसाचं कौतुक करण्यासाठी तिला राज यांनी कृष्णकुंजवर बोलावलं होतं. केतकीही कृष्णकुंजवर गेली होती. यावेळी तिने राज ठाकरेंच्या हातावर एपिलेप्सी जनजागृतीचा बँड बांधला होता. त्यानंतर तिने मीडियाशी संवादही साधला होता. साहेबांनी मला स्वत: बोलावलं होतं. माझ्या धाडसाचं त्यांनी कौतुक केलं होतं. ज्या काही बायकांचा, व्यक्तिंचा दबलेला आवाज असतो त्याला आवाज मिळाला. त्यासाठीच साहेबांनी बोलावलं आणि माझं अभिनंदन केलं, अशी प्रतिक्रिया केतकीने दिली होती.
राज ठाकरे यांनी पत्रक काढून केतकीच्या पोस्टवर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत… आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येण साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे, असं राज यांनी म्हटलं आहे.