मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेती केतकी चितळेवर अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. केतकीची तीन दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर आज तिला ठाणे सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयात सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस तिचा ताबा घेण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी केतकीच्या कोठडीची मागणी केली असता, न्यायालयाकडून केतकी चितळेची (Ketaki Chitale) कोठडी गोरेगाव पोलिसांकडे देण्यात आलीय. दरम्यान, आता केतकीला जेजे रुग्णालयातून ठाणे कारागृहात नेण्यात आल्याची माहिती मिळतेय.
केतकीने जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर ठाणे गु्न्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं सांगावं असं न्यायालयाने म्हटलंय. तोवर तिच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नव्हती. केतकीच्या जामीन अर्जावर आता थोड्याच वेळात सुनावणी होणार असल्याची माहिती मिळतेय.
आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकीच्या विरोधात पुण्यातही दाखल झालेल्या गुन्ह्यांप्रकरणी तिला ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेसाठी पुणे पोलीस, ठाणे गुन्हे शाखेत हजर झाले होते. पुणे पोलिसांच्या एका टीमने केतकीशी चर्चा केल्याची माहितची आहे. आता गोरेगाव पोलिसांनंतर केतकीचा ताबा पुणे पोलिसांकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
अभिनेत्री केतकी चितळेविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात ठाणे, गोरेगाव, पुणे, धुळे, नाशिक, उस्मानाबाद आणि इतरही काही ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तिला इतर ठिकाणचेही पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. खासकरून मुंबईतील गोरेगाव पोलीस आणि पुणे पोलिसांकडून केतकी चितळेला ताब्यात घेण्यासाठी कसोटीने प्रयत्न सुरु आहेत.