किरीट सोमय्या यांचं मोठं पाऊल, उद्धव ठाकरे यांच्या खरंच अडचणी वाढणार? नेमकं काय घडणार?
भाजप नेते किरीट सोमय्या आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.
सुमित सरनाईक, मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केलीय. किरीट सोमय्या यांनी अलिबागमधील रेवदंडा पोलीस ठाण्यात रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. अलिबागमधील कथित बंगल्यांप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आलीय. दरम्यान, अलिबागमधील बंगल्यांप्रकरणी लक्ष घालणार असल्याचं आश्वासन आपल्याला मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
“उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांच्यासोबत अलिबाग समुद्र किनाऱ्यावर अन्वय नाईक यांच्याकडून जागा घेतली. त्या जागेवर 19 बंगले बांधले. त्यांनी ग्रामपंचायतीचा सर्व रेकॉर्डमध्ये गैरप्रकार केला. त्यामुळे निधी चौधरी, किरण पाटील आणि ठाकरे परावर कलम 420, 467, 468 आणि 34 यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल होणारच”, असा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय.
“आता पोलिसांनीदेखील चौकशी सुरु केलीय. स्वभाविक आहे, मी त्यांच्याकडे सर्व 15 वर्षांचे रेकॉर्ड दिले आहेत”, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
“रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात 19 बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले”, असा दावा सोमय्यांनी केला.
“रश्मी ठाकरे यांच्या जमीन व्यवहाराची कागदपत्रे गहाळ करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जमीन व्यवहाराचे कागदपत्रे गहाळ करायला लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे”, असं किरीट सोमय्या म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार?
किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. अर्थात या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जाईल. पण या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढतील का? असा प्रश्न उपस्थित होतोय. किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.