Navneet Rana: भांडण नेत्यांचं, ताप डॉक्टरांना, नवनीत राणांच्या एमआरआय फोटोवरुन शिवसेना आक्रमक, पेडणेकर, कायंदे लीलावतीत, डॉक्टरांवर भडीमार
Navneet Rana: आमदार मनिषा कायंदे आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज लिलावती रुग्णालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरले.
मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची लिलावती रुग्णालयात (lilavati hospital) एमआरआय चाचणी करण्यात आली. एमआरआय चाचणीचे राणा यांचे फोटोही व्हायरल झाले. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे (manisha kayande) आणि किशोरी पेडणेकर यांनी आज लिलावती रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. नवनीत राणा यांचं एमआयआर सुरू असताना फोटोग्राफर आत गेलेच कसे? एकावेळी तीन चार लोक एमआरआय रुममध्ये आत गेलेच कसे? एमआयआर रुममध्ये मोबाईल गेलाच कसा? मशीनजवळ कुठलाही धातू वा इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परवानगी नसते, मग या वस्तू गेल्याच कशा? या टेस्टचं शुटिंग झालंच कसं? एमआयआर खरंच झाला होता का? की फक्त ड्रामा होता? असा सवाल किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी केला. यावेळी त्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत लिलावती रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. तसेच आम्हाला एमआरआय रिपोर्टची कॉपी द्या, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असं सांगतानाच तुमच्यावर काही दबवा होता का? होता तर तुम्ही पोलिसात तक्रार द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
आमदार मनिषा कायंदे आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज लिलावती रुग्णालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरले. रुग्णालयाचे सीईओंवर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर रेडिओलॉजिस्ट डॉक्टर देशमुख यांनाही दोन्ही नेत्यांनी धारेवर धरलं. सीसीटीव्ही कॅमेराचा रिपोर्ट द्या. सर्व स्टाफला बोलवा, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. रेडिओलॉजीच्या सर्व कर्मचाऱ्यांना बोलवा. नवनीत राणांचा रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही जाणार नाही. कोणतीही व्यक्ती कोणत्याही पदावर असू द्या, तो रुग्णालयात असतो तर तो रुग्ण असतो. आमच्या रुग्णाला स्पॉयंडेलिसिसचा त्रास आहे. पण त्यांचं डोकं फिरलं आहे, असा टोला लगावतानाच एमआरआय रुममध्ये कोणतीही वस्तू नेण्यास मनाई आहे. मग कॅमेरे नेलेच कसे? ही रुग्णालयाची चूक, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
फोटो काढणाऱ्यांवर कारवाई का केली नाही?
नवनीत राणा यांचे एमआरआयचे फोटो कसे काढले? एमआयआर काढला की नाही? की ते फेक होतं का? फोटो काढणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? कुणी तरी बोलल्यानंतर तुम्ही कारवाई करत आहात. त्याआधी का केली नाही? उद्या कोणी उठून कुणाचेही शुटिंग करणार, ते चालेल का? सर्व नियम पाळले पाहिजे. तुम्ही जर प्रेशरमध्ये असाल तर तुम्ही पोलिसांकडे तक्रार करा. तुम्हाला घाबरवलं ते सांगा, असं मनिषा कायंदे म्हणाल्या.
एमआयआर झालंच नाही हे सिद्ध केलं तर
यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. एमआयआर झालं की नाही झालं? असा सवाल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. त्यावर डॉक्टरांनी झालं म्हणून सांगितलं. तेव्हा, एमआरआय झालंच नाही हे आम्ही सिद्ध केलं तर? असा सवाल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. त्यावर डॉक्टरांची बोलतीच बंद झाली.
सेक्युरीटी ऑफिसरवर कारवाई करणार
यावेळी लिलावतीचे सीईओंनी आम्ही सेक्युरीटी ऑफिसरवर कारवाई करू, असं सांगितलं. पेशंट आत गेला. त्यांच्यासोबत स्टाफ जातो. त्यांना किती वेळ लागेल माहीत असतं. त्यावेळी दुर्देवाने दरवाजा उघडा होता. नेहमी दरवाजा बंद असतो, असं सीईओने सांगितलं. त्यावर किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी आक्षेप घेतला. एमआयआर करताना कधीच दरवाजा उघडा ठेवला जात नाही. मग दरवाजा उघडा होता असं कसं म्हणता? असा सवाल त्यांनी केला.