Kishori Pednekar : शिवसैनिकाच्या आईवर हात घातलाय, तो कसा शांत राहील? बंडखोर आमदारांवर किशोरी पेडणेकर संतापल्या
प्रत्येकाला वाटत होते की शिवसेना फुटेल, उद्धवजींची शिवसेना संयमी आहे. संयम राखला. सगळ्या गोष्टीत राखला. पण तुम्ही आमची सेनाच बुडवायला निघालात, तर शिवसैनिक ऐकणारच नाही, असे शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबई : पेटवणे वगैरे हे आमचे काम नाही. शिवसेना संयम ठेवत आहे. मात्र शिवसैनिकाच्या आईवर हात घातला आहे, तो कसा शांत राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिली आहे. शिवसेनेची कार्यकारिणी बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, की कार्यकारिणीत सहा ठराव झाले आहेत. सहाव्या ठरावाविषयी त्यांनी सांगितले, की जर तुम्हाला मते (Vote) मागायची आहेत, तर तुमच्या बापाच्या जीवावर मागा. शिवसेनेच्या बापाच्या जीवावर मागू नका. शिवसेनेचा एकच बाप आहे आणि ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. एकनाथ शिंदे यांचे नेतेपद काढले आहे, की नाही, हे मला माहीत नाही. मात्र काढण्याची वेळ आली आहे, असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
‘तुम्ही आमची सेनाच बुडवायला निघालात’
प्रत्येकाला वाटत होते की शिवसेना फुटेल, उद्धवजींची शिवसेना संयमी आहे. संयम राखला. सगळ्या गोष्टीत राखला. पण तुम्ही आमची सेनाच बुडवायला निघालात, तर शिवसैनिक ऐकणारच नाही. राज्यभर वणवा पेटेल का, असे विचारल्यावर, मी नाही बोलत. पेटवणे वगैरे आमचे काम नाही. आम्ही नेहमीच आवाहन करतो, की शांत राहा. पण शेवटी शिवसैनिकाच्या आईवर हात घातला आहे. तो कसा शांत राहील, असा संतप्त सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांनी भावनिक आवाहन करत बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना परत येण्याचे आवाहन केले होते.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
‘गद्दारांवर कारवाई होणार’
शिवसेनेच्या ज्या आमदारांनी पक्षाशी गद्दारी केली, ते कोणत्याही पदावर असोत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकारी उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. लवकरच त्यावर अंमलबजावणी होईल, अशी माहिती कार्यकारिणीच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी दिली. संध्याकाळपर्यंत कारवाई काय ते स्पष्ट होईल, कोण मंत्रिपदावर राहणार, कोण नाही ते दिसेल, अशा शब्दात राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.