डोळे गरगरायला लावणाऱ्या 60 मजली वन अविघ्न पार्कला आग, जाणून घ्या इमारतीबद्दलची संपूर्ण माहिती
मुंबईतील सर्वाधिक उंच इमारतींपैकी एक असणारी वन अविघ्न ही इमारत अनेकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. मध्य रेल्वेवरील करीरोड स्थानकातून ही इमारत अगदी सहजपणे दृष्टीस पडते. वन अविघ्न पार्क ही एक दुहेरी लक्झरी निवासी इमारत आहे. | One Avighna park
मुंबई: मुंबईतील सर्वाधिक उंच इमारतींपैकी एक असणाऱ्या लालबागमधील वन अविघ्न टॉवर्सला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. इमारतीच्या 19 व्या मजल्यावर ही आग लागली. मात्र, वाऱ्याच्या झोतामुळे आता ही आग जवळपास 20 व्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली असून आगीने अत्यंत भीषण स्वरुप धारण केले आहे. अविघ्न टॉवर्स ही हायराईझ बिल्डिंग असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात बरेच अडथळे येत आहेत.
मुंबईतील सर्वाधिक उंच इमारतींपैकी एक असणारी वन अविघ्न ही इमारत अनेकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. मध्य रेल्वेवरील करीरोड स्थानकातून ही इमारत अगदी सहजपणे दृष्टीस पडते. वन अविघ्न पार्क ही एक दुहेरी लक्झरी निवासी इमारत आहे. या इमारतीची उंची 247 मीटर इतकी आहे. निओ-मॉडर्न आर्किटेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने डिझाइन केलेली ही इमारत अविघ्न इंडिया लिमिटेडकडून बांधण्यात आली आहे.
2016 मध्ये बांधकामाला मिळाली होती मंजुरी
वन अविघ्न पार्क ही इमारत अगदी बांधकामापासूनच चर्चेचा विषय ठरली होती. करी रोड स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही इमारत आहे. सुरुवातीला वन अविघ्न पार्कमध्ये 64 मजल्यांचे दोन टॉवर्स बांधले जाणार होते. मात्र, मुंबई महानगरपालिकेने त्याला परवानगी नाकारली होती. अखेर पालिकेने 61 मजल्यांच्या टॉवर्सला मंजुरी दिल्यानंतर या प्रकल्पाला 2016 साली हिरवा कंदील मिळाला होता.
कोट्यवधींचे अलिशान फ्लॅटस
वन अविघ्न पार्क या इमारतीमध्ये मुंबईतील अनेक धनाढ्यांचे फ्लॅटस आहेत. 2019 मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला होता. येथील दोन्ही टॉवर्समध्ये मिळून एकूण 208 फ्लॅटस आहेत. या फ्लॅटसचे क्षेत्रफळही वेगवेगळे आहे. थ्री, फोर आणि फाईव्ह बीएचकेच्या या फ्लॅसटची किंमत कोट्यवधी रुपये आहे. एका स्क्वेअर फिटची किंमत जवळपास 31.84 हजार रुपये इतकी आहे.
नेमकं काय घडलं?
करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेलं नाही.
संबंधित बातम्या:
EXCLUSIVE VIDEO | मुंबईत अविघ्न टॉवरमध्ये आग, जीव वाचवताना हात सुटून रहिवासी थेट खाली कोसळला
(Major Fire at One Avighna park building in Mumbai)