narayan rane vs rajan teli: राजन तेली यांच्या ठाकरे शिवसेनेत प्रवेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलणार आहेत. राजन तेली यांनी भाजप सोडली आहे. उद्धव ठाकरे यांची साथ घेतली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे यांना टार्गेट केले. यामुळे पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना उबाठा असा संघर्ष तळ कोकणात दिसणार आहे. नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र सिंधुदुर्गात विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याने राणेंसमोर दोन्ही पुत्रांसोबत केसरकरांचा विजय करण्याचे आव्हान असणार आहे. राणेना खिंडीत पकडण्यासाठी शिवसेना कशी व्यूहरचना करते याकडेही सर्वांचं लक्ष असेल.
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर तळ कोकणात किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात चांगले लीड घेतले होते. त्यामुळेच राणेंचा विजय झाला होता. नारायण राणे यांना लीड मिळवून देण्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा होता. मात्र त्यावेळी राणे,केसरकर आणि भाजपमधून आणखी एक इच्छुक असलेले विशाल परब ही सर्व मंडळी एकत्रित होते.
राजन तेली यांच्या उद्धव ठाकरे गटातील प्रवेशामुळे आता सावंतवाडीतील राजकीय समीकरणे चेंज होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सावंतवाडीत विनायक राऊत यांना ५० हजार मते मिळाली होती. ही मते शाबूत ठेवून भाजपची काही मत फोडण्यात राजन तेली यशस्वी ठरल्यास या भागातील निवडणुकीच चित्र वेगळ दिसू शकत. त्यातच भारतीय जनता पक्षाचे विशाल परब हे सुद्धा इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळत नसल्याने ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास केसरकरांच्या विजयासाठी राणेंना पूर्ण ताकत लावावी लागणार आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे असे दोन गट आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या गटाने कायमच दीपक केसरकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे केसरकर यांच्या विजयासाठी चव्हाण, राणे आणि केसरकर या तिघांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील. राजन तेली यांची सुद्धा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ताकद आहे. मात्र तेलींना स्थानिक शिवसेना कशा पद्धतीने स्वीकारते हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच राजन तेली यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चेंज होणार आहेत. आगामी काळात कोकणातील राजकारण पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे असेच पाहायला मिळणार आहे.
दीपक केसरकर हे गेले पंधरा वर्ष चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांवर ते अन्याय करत आहेत. या संदर्भात वरिष्ठांना सांगितल्यावरही काही बदल झाला नाही. ते पालकमंत्री असून देखील कुठलाही विकास त्या ठिकाणी झाला नाही. जेवढी आश्वासन दिली ते देखील पूर्ण केली नाही. पंधरा वर्षातील गेली आठ वर्षे केसरकर हे तिथे मंत्री आहेत, त्यांच्या कामगिरीची नाराजगी या मतदारसंघात आहे. कोणालाही उमेदवारी द्या, परंतु केसरकर यांना देऊ नका, अशी विनंती आपण भाजपच्या वरिष्ठांकडे केली होती.
आपले नारायण राणे यांच्या सोबत काही बोलणं झालं नाही. तसेच काही बोलण्याचा प्रश्न येत नाही. मला शिवसेना उबाठाकडून तिकीट मिळेल किंवा नाही मिळेल त्याची माहिती नाही. केसरकरांचा जो काही त्रास आहे त्यामुळे हा निर्णय घेतला. माझी कुठलीही मागणी नाही. जी जबाबदारी देतील ती स्वीकारेल, असे राजन तेली यांनी सांगितले.