भाजपचे महाराष्ट्रात 1 कोटी अँबेसेडर, कशासाठी?; काय आहे प्लान?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते कामाला लागले आहेत. भाजप नेत्यांच्या राज्यभर बैठकांचे सत्र सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कामांचा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. मुंबईतही भाजपची काल महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतानाच कार्यकर्त्यांना निवडणुकीची जय्यत तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 31 डिसेंबर 2023 : पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल आणि लोकसभा निवडणुकीचा आलेला सर्व्हे या पार्श्वभूमीवर भाजप कामाला लागला आहे. भाजपने केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खास प्लान तयार केला आहे. या प्लाननुसार महाराष्ट्रात एक कोटी अँबेसेडर तयार करण्यात येणार आहेत. या अँबेसेडरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात विकासकामे आणि विकास योजनांची माहिती दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत सरकारची कामं जनतेपर्यंत जावीत यासाठीचा हा प्लान असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्यभरात प्रदेश भाजपा तर्फे एक कोटी पेक्षा अधिक विकसित भारत अँबेसेडर बनविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती भाजपाच्या नमो ॲप अभियानाचे राष्ट्रीय संयोजक कुलजीत सिंग चहल यांनी दिली आहे. भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कुलजीत सिंग चहल यांनी विकसित भारत अँबेसेडर अभियानाची माहिती दिली. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख आणि विकसित भारत ब्रँड अँबेसेडर अभियान प्रदेश संयोजक नवनाथ बन उपस्थित होते.
कमीत कमी दहा अँबेसेडर तयार केले जाईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत संकल्पासोबत हे विकसित भारत ब्रँड अँबेसेडर जोडले जातील. मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी कल्याणकारी योजनांचा लाभ समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य हे अँबेसेडर करणार आहेत. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता असे कमीत कमी 10 अँबेसेडर तयार करेल, अशी माहितीही चहल यांनी दिली. ज्या लाभार्थ्यांना मोदी सरकारच्या योजनांचा लाभ झाला त्या सर्वानी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन ही चहल यांनी केले. प्रदेश भाजपाने १ कोटी विकसित भारत अँबेसेडर बनवण्याचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार व्यक्त केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
निवडणुका ताकदीने लढा
दरम्यान, पुण्याच्या भोर तालुक्यात भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली. याबैठकीत लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. भाजपचे बारामती लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली भोर विधानसभा मतदार संघातील सुपर वॉरियर्स आणि पदाधिकारी यांची बैठक झाली. नवनाथ पडळकर यांना भाजपकडून बारामती लोकसभा मतदार संघांची लोकसभा प्रभारी म्हणून जवाबदारी मिळाल्यानंतर पडळकर ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत. बैठकीत बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांना निवडणूकीसाठी करण्यात मार्गदर्शन आलं. यावेळी सर्व निवडणूका ताकदीने लढविण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.