Kurla Bus Accident : या बसचा ब्रेक फेल होऊच शकत नाही, तज्ज्ञांचा दावा काय?
Kurla bus accident news : कुर्ला पश्चिम परिसरात बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने पादचाऱ्यांसह वाहनांना चिरडले. यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी आता आरोपी चालक संजय मोरे याचा वाहन चालवण्याचा परवाना ताब्यात घेतला आहे.
कुर्ला पश्चिम परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना धडक दिली. त्यात काही नागरिकांना चिरडलं. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेने मुंबई हादरली आहे. दरम्यान पोलिसांनी आता संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी चालक संजय मोरे याचा वाहन चालवण्याचा परवाना ताब्यात घेतला आहे. या इलेक्ट्रिक बसची पाहणी केल्यानंतर ब्रेक फेलच होऊ शकत नाही, असा तज्ज्ञांनी दावा केल्याने बेस्टमधील काही अधिकाऱ्यांवर हे प्रकरण चांगलेच शेकणार असल्याचे दिसते. काय आहे माहिती?
332 क्रमांकाची बस काळ म्हणून धावली
बेस्टची 332 क्रमांकाची इलेक्ट्रिक बस ही कुर्ला पश्चिम परिसरात काहींसाठी काळ म्हणून धावली. कुर्ल्यातील व्हाईट हाऊस परिसरात हा अपघात झाला. प्रथम एका ऑटोला धडक दिल्यानंतर या बसने अनेक वाहनांचा चुराडा केला आणि पादचाऱ्यांना चिरडले. अखेरीस आंबेडकर कॉलेजच्या गेटला बसने धडक दिली. स्थानिक नागरिकांनी बसचा पाठलाग करत बस चालक संजय मोरे याला चोपले.
दरम्यान RTO चे अधिकारी कुर्ला आगारात दाखल झाले आहेत. ते बसची पाहणी करत आहेत. त्यासोबत पोलिसांचा पथक देखील कुर्ला आगारात आलेला आहे. सध्या बस देखील चालू केलेली आहे. बस मध्ये नक्की काय बिघाड होता याचा तपास केला जातोय. तसेच बेस्ट तज्ञ पथक याचा आढावा घेत आहे. आरोपी मोरे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर या भागात गतिरोधक असता आणि अतिक्रमण झाले नसते तर कुणाला जीव गमवावा लागला नसता असा दावा रहिवाशांनी केला आहे.
मोठी बस चालवण्याचा नव्हता अनुभव
पोलीसानी आरोपीचा वाहन चालवण्याचा परवाना ताब्यात घेतला आहे. आरोपी संजय मोरेला ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवताना निकष पाळण्यात आले होते का याची चौकशी करण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनाशी बोलून पोलीस पडताळणी करत आहेत. या अपघात प्रकरणात बेस्टच्या काही अधिकाऱ्यांची आणि सबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वी आरोपी संजय मोरे छोट्या मिनीबस आणि इतर गाड्या चालवत होता पण त्याला मोठी बस चालवण्याचा अनुभव नव्हता, असे समोर आले आहे.
तज्ज्ञांचा मोठा दावा
पोलिसानी इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि काही तज्ञांशी संवाद साधला. इलेक्ट्रिक बस पूर्णपणे सुस्थितीत आहे बसमध्ये कुठलाही बिघाड नसल्याचे समोर आले आहे. इलेक्ट्रिक बसमध्ये ब्रेक फेल झाल्यावर किंवा काही मोठा तांत्रिक बिघाड झाल्यास बस पुढे जात नाही असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. बेस्टकडे असलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये ही व्यवस्था आहे. त्यामुळे अपघातग्रस्त बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा खोटा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.