लाडकी बहीण योजनेचं काय होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेतील अलीकडील बदल आणि चिंतांबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. या योजनेच्या निकषांमुळे अनेकांचे अर्ज रद्द झाल्याने निर्माण झालेल्या वादावर त्यांनी भाष्य केले.

राज्य सरकारने निवडणुकांपूर्वी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेची सध्या चांगलीच चर्चा आहे. सध्या या लाडकी बहीण योजनेत विविध निकष लावले जात आहेत. त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी निकष लावल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून ही योजना रद्द होईल, अशी चर्चाही रंगली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचे नेमकं काय होणार याबद्दल भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसरी मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिटला भेट दिली. यावेळी मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत आणि टीव्ही भारत वर्ष सीनिअर अँकर गौरव अगरवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले.
“लाडकी बहिणींसाठी ४५ हजार कोटी”
“राज्यातील सर्व योजनांचा निधी ६० हजार कोटी आहे. त्यात दोन मेजर कंपोनंट आहे. एक म्हणजे १५०० रुपये महिलांना देत आहोत. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही विचार करून हा निर्णय घेतला आहे. लाडकी बहिणींसाठी ४५ हजार कोटी देत आहोत. त्याचा ताण आमच्या बजेटवर येणार आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“महिलांना लखपती दिदी करणार”
“नागपूरमध्ये महिलांनी एक स्मॉल क्रेडिट सोसायटी तयार केली आहे. त्यात १५०० रुपये टाकून ३० लाख रुपये टाकले आहेत. हे मॉडल आम्ही राज्यात नेणार आहोत. केवळ पैसे घेणाऱ्या नाही तर गुंतवणूकदार महिला तयार करणार आहोत. आम्हाला याच महिलांना लखपती दिदी करणार आहोत. अशा योजनामुळे रेव्हेन्यू डिफिशियट वाढवते. पण त्याचा सामाजिक दृष्टिकोन आहे. त्यामुळे आम्ही त्यात बॅलन्स साधत आहोत”, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
उद्या कॅगही आम्हाला जाब विचारेल
“२ कोटी ८० लाख महिला त्यात आहे. आम्ही आधी छाननी केली नाही. योजना लागू केली. त्यात निकष होते. काही लोकांनी निकष पाहिले नाही. तरीही फायदा घेतला. त्यामुळे आम्ही निकषात बसणाऱ्यांनाच यात ठेवणार आहोत. उद्या कॅगही आम्हाला जाब विचारेल. पण छाननीतून फार महिलाांना डावललं जाणार नाही. कमी महिला अपात्र ठरतील”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.