4 दिवसांत 1.50 कोटींचं दान! लालबागच्या राजाच्या दानपेटीत फक्त कॅशच नाही, तर बरंच काही! जाणून घ्या आणखी काय?
Lalbaugcha Video : चार दिवसांत लाखो गणेशभक्तांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यातील असंख्य गणेशभक्तांनी दिलेल्या देणगीची रक्कम किती होती, हेही समोर आलंय. चार दिवसात 1 कोटी 50 लाख रुपये इतकं दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत जमा झालंय.
मुंबई : कोरोना महामारीनंतर पूर्ण क्षमतेनं गणेशोत्सव (Ganapti Festival 2022) यंदा साजरा होतोय. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवचा उत्साह दुप्पट असल्याचं दिसून येतंय. दरम्यान, विशेष म्हणजे मुंबईतच्या प्रसिद्ध गणपती मंडळांमध्ये (Famour Ganpati in Mumbai) घेतल्या जाणाऱ्या आघाडीच्या नावांमध्ये एक लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं नाव घेतलं जातं. यंदा लालबागच्या राजाने (Lalbaugcha Raja) एक नवा विक्रमच केला आहे. अवघ्या चार दिवसांतच लालबागचा राजा मंडळात एक कोटीपेक्षाही अधिकची देणगी जमा झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. चार दिवसांत तब्बल दीड कोटी रुपये इतकं भरघोस दान गणेशभक्तांनी राजाच्या चरणी अर्पण केलंय.
Video : भर पावसातही दर्शनासाठी गर्दी
चार दिवसांत लाखो गणेशभक्तांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यातील असंख्य गणेशभक्तांनी दिलेल्या देणगीची रक्कम किती होती, हेही समोर आलंय. चार दिवसात 1 कोटी 50 लाख रुपये इतकं दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत जमा झालंय. यामध्ये रोख रकमेसह नाण्यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सोने, चांदी देखील भक्तांनी अर्पण केली आहे. जवळपास 200 तोनं सोनं आणि 1700 तोळं चांदीचं दान लालबागच्या राजाच्या दानपेटी अर्पण करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.
यंदा लालबागच्या राजाच्या दानपेटीत गेल्या चार दिवसांत जमा झालेलं दान पाहता सरासरी 4 ते पाच कोटी रुपयांचं दान जमा होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. दरवर्षी लालबागचा राजाला किती देणगी जमा होते, याची माहिती मंडळाच्या वतीने दिली जाते. तसंच किती देणगी जमा होते, याची आकडेवारी जाणून घेण्यासाठी लोकांमध्येही कुतूहल पाहायला मिळतं. अशातच आता शनिवारी मोठी गर्दी राजाच्या दर्शनासाठी पाहायला मिळाली होती. आज रविवारी असल्याने पुन्हा मोठ्या संख्येनं भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करण्याची शक्यताय. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या (सोमवारी 5 सप्टेंबर) लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत.
Video : चार दिवसांत तब्बल दीड कोटी दान
आज पावसाची हजेरी
दरम्यान, रविवारी मोठ्या संख्येनं भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते. मात्र अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. बराच वेळ रांगेत उभं राहून थकलेल्या भाविकांचा उत्साह पावसाच्या येण्याने अचानक वाढला. यावेळी छत्र्या घेऊन काही भक्तांनी रांगेत उभं राहणं पसंत केलं. तर काहींनी पावसाचे थेंब अंगावर झेलतच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. अचानक आलेल्या पावसाने गणेशभक्तांचा गोंधळ उडेल, अशी शक्यता होता. पण तसं न होता घामाघूम झालेल्या सगळ्यांनाच पावसाने दिलासा दिला.