कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील याला काल बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला साकीनाका पोलिसांनी कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत कोठडी दिली आहे. पोलिसांनी ललित पाटील याची काल कसून चौकशी केली. या चौकशीत त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे अनेकजण गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ललितला कुणा कुणाचा वरदहस्त होता? कोण त्याला मदत करायचं? याची माहिती समोर येणार असल्याची शक्यता असून त्यामुळे अनेक बडे मासे गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ललित पाटील याची पोलिसांनी काल कसून चौकशी केली. यावेळी त्याने पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. ललित पाटील पैशाच्या जोरावर हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करत असल्याचं त्याच्या चौकशीतून उघड झालं आहे. ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना तो सातत्याने पैसे देत होता. ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत होता आणि ससूनच्या बाहेर जाऊन बैठका घ्यायचा अशी माहितीही ललितने पोलिसांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
ललितवर नजर ठेवण्यासाठी ससूनमध्ये पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. या तैनात पोलिसांना तो पैसे द्यायचा. ससूनच्या बाहेर अनेकदा त्याचा भाऊ भूषण पाटीलला तो भेटायचा, अशी माहितीही या चौकशीतून समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं. ज्या दिवशी तो ससूनमधून फरार झाला त्या दिवशी दीड तासात परत येतो असं सांगून तो बाहेर पडला आणि फरार झाला असल्याची धक्कादायक माहितीही त्याच्या चौकशीतून समोर आली आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणात डॉक्टर आणि पोलीस सर्वच गोत्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ललित पाटीलला कुणाचा राजकीय वरदहस्त होता का? त्याला बाहेरून कोण मदत करत होतं याची चौकशी सुरू आहे. तसेच त्याच्या संपर्कात कोण कोण होतं? त्याला ससूनमध्ये भेटायला कोण कोण यायचं? त्याच्याकडून कुणा कुणाला हप्ते जायचे? याचीही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, पुणे पोलीस मुंबईत आले आहेत. ललित पाटीलचे दोन सहकारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. या दोन्ही सहकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी पुणे पोलीस आले आहेत. या दोघांचा पुणे पोलीस लवकरच ताबा घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, ललित पाटील हा आधी राजकीय कार्यकर्ता होता. नंतर तो काही गुंडाच्या संपर्कात आला. त्यानंतर तो ड्रग्जच्या धंद्यात आला. 2020मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. सातत्याने डॉक्टरांना मॅनेज करून तब्येत खराब असल्याचा अहवाल तो कोर्टात सादर करायचा, अशी माहितीही मिळत आहे.