मुंबई: गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर डॉक्टरांकडून तातडीने उपचार केले जात आहेत. लतादीदींची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनीही तातडीने ब्रीच कँडीत (Breach candy hospital) धाव घेतली असून डॉक्टरांकडून लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. तसेच मंगशेकर कुटुंबीयांशीही संवाद साधून राज हे लतादीदींच्या प्रकृतीची माहिती घेत आहेत. मंगेशकर कुटुंबीयांशी कौटुंबिक संबंध असणाऱ्यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात धाव घेतली आहे. मात्र, मंगेशकर कुटुंबीय आणि मंगेशकर कुटुंबीयांशी संबंधितांनाच रुग्णालयात सोडण्यात येत आहे. इतर कुणालाही प्रवेश दिला जात नाही.
लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टरांची भेट घेऊन लतादीदींच्या प्रकृतीबाबतची माहिती घेतली. तसेच मंगेशकर कुटुंबीयांचीही भेट घेऊन माहिती घेतली. लता मंगेशकर या गेल्या 27 दिवसांपासून ब्रीच कँडीत उपचार घेत आहेत. त्यांना न्यूमोनिया झाला होता. शिवाय कोरोनाची लागणही झाली होती. अनेक दिवस त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर दोन दिवसांपूर्वी त्यांचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं होतं. मात्र, आज सकाळी पुन्हा त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे चिंता वाढली आहे.
गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडीत उपचार सुरू आहे. त्यांनी उपचारांना प्रतिसादही द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं होतं. त्यामुळे त्या लवकरच घरी परततील असं सांगितलं जात होतं. मात्र, आज अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने चिंता वाढली आहे.
लतादीदींना न्यूमोनिया झाला होता. त्यावर त्यांनी मातही केली होती. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून होते. मात्र, जुन्या आजारामुळे औषधांचा किती परिणाम होईल याबाबत डॉक्टरांनी साशंकता व्यक्त केली होती.
संबंधित बातम्या: