‘शिंदे गटाच्या आमदारांनी एअर हॉस्टेसचा विनयभंग केला’, असीम सरोदे यांचा गंभीर आरोप
वकील असीम सरोदे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गटाचे आमदार दोन वर्षांपूर्वी गुवाहाटीला गेले तेव्हा त्यांनी हॉटेलमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग केला होता, असा गंभीर आरोप असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई | 4 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाच्या आमदारांवर वकील असीम सरोदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. “शिंदे गटाच्या आमदारांनी गुवाहाटीमधील एअर हॉस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी दारुच्या नशेत झिंग होऊन सर्व गोष्टी केल्या”, असा आरोप असीम सरोदे यांनी केला. तसेच शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या 2 आमदारांना मारहाणदेखील करण्यात आली, असा धक्कादायक दावा असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. असीम सरोदे यांनी धाराशिवमधील ‘निर्भय बनो’ सभेत याबाबतचे आरोप केले आहेत. दुसरीकडे असीम सरोदे यांच्या या आरोपांना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. “महापत्रकार परिषदेतच कळालं सरोदे ठाकरे गटाचे पुढारी आहेत”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.
“गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले. त्यांना आठ किलोमीटर गेल्यानंतर पकडून आणण्यात आलं. त्यांना गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कुणी मारहाण केली?”, असा सवाल असीम सरोदे यांनी केला.
‘एअर होस्टेसचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला?’
“गुवाहाटीला जिथे थांबले होते तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. पण स्पाईस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी काही रुम्स बुक केलेल्या होत्या. त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झाला होता. जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या. एअर होस्टेसचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला? हे महाराष्ट्राने शोधलं पाहिजे. दारुच्या नशेत झिंगत असलेल्या आमदारांनी या गोष्टी केल्या. हा पैशांचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही”, असं असीम सरोदे म्हणाले.
संजय शिरसाट काय म्हणाले?
असीम सरोदे यांच्या आरोपांना संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. “तुम्हाला आठवत असेल तर ठाकरे गटाने महापत्रकार संवाद परिषद घेतली होती. त्यादिवशी त्या ठिकाणी असीम सरोदे ज्या अविर्भावात बोलले, त्यांनी वकील म्हणून बोलायला पाहिजे होतं, पण ते पुढारी म्हणून बोलले. त्याचदिवशी मनात पाल चुकचुकली की हा ठाकरे गटाचा नेता आहे. दोन आमदारांना मारहाण केली. एका एअर हॉस्टेसचा विनयभंग केला. अरे तुला कुठे स्वप्न पडलं. तिथे सर्व मीडिया, मोठी पोलीस सुरक्षा होती. त्यांना तसेच दीड पावणे दोन वर्षानंतर जाग आली? हे आरोप केल्यानंतर ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते खूश होतील या भावनेतून त्यांनी हे आरोप केले आहेत. त्यामुळे या आरोपांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
शंभूराज देसाई काय म्हणाले?
असीम सरोदे यांच्या आरोपांवर मंत्री शंभूराज देसाई यांनी संताप व्यक्त केला. “असीम सरोदे दोन वर्षांनी जागी झाले का? असीम सरोदे वकील आहेत ना? त्यांना कायदा आणि नियम कळतो ना? समजा हे असं काही घडलं असेल तर त्यावेळी झोपला होता का? काहीतरी रंगवून सांगत आहेत. आम्ही गुवाहाटीहून परत येऊन दोन वर्ष झाली. हे सर्व रचलेलं आहे. हे असं रचून आमच्या लोकांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. गुवाहाटीत जा, तक्रार करा, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटा. जा खात्री करा”, असं प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी दिलं.