मुंबई : खारघरमधील दुर्घटनेबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. वकील नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी खर्च केलेले 14 कोटी रुपये आयोजकांकडून वसूल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. राजकीय फायद्यासाठी 10 लाख लोकांना कार्यक्रमासाठी बोलावण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय. व्हीआयपी पाहुणे एसीमध्ये जेवले, तर लोकांना मरण्यासाठी सोडून दिलं, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे आतापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन विरोधकांकडून सातत्याने सरकारवर निशाणा साधला जातोय. याप्रकरणी वेगवेगळे दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. असं असताना आता हा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे.
वकील नितीन सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर गुन्हेगारी स्वरुपाची कारवाई करावी. कारण त्यांनी राजकीय फायद्यासाठी 10 लाख लोकांना कार्यक्रमासाठी बोलावलं, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
आता याचिकेवर काय सुनावणी होते, याबाबत कधी सुनावणी होते, मुंबई उच्च न्यायालय काही निर्देश देतं का, सुनावणीत काय-काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सरकार आणि न्याय व्यवस्था या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने आजच सरकारला औरंगाबादच्या नामांतराबद्दल महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात खारघर दुर्घटनेप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
खारघरमध्ये गेल्या आठवड्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रधान सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमासाठी तब्बल 14 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून लाखो श्रीसेवक खारघर येथे कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. पण हा कार्यक्रम दुपारी आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित श्रीसेवकांना ऊन्हाचा त्रास झाला. यामध्ये अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यातून 50 ते 60 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला.
खारघरमधील या दुर्घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओ हे अस्वस्थ करणारे आहेत. संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन काही लोकांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधला जातोय. तर काहींचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. या घटनेप्रकरणी विरोधकांकडून सरकारवर सातत्याने निशाणा साधला जातोय.