Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पाऊस, विधानसभेचे कामकाज तहकूब, शाळांना सुट्टी, गरज नसेल तर बाहेर पडू नका
Mumbai Rain Update: मुंबईतील कर्मचाऱ्यांना सुखरूप घरी जाता यावे म्हणून विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. विधानसभेचे कामकाज आता मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे. मुंबईतील पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस पुन्हा सुरु झाला. रविवारी मध्यरात्री एक वाजेपासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस मुंबईत झाला. त्यानंतर मुंबई हवामान विभागाने सोमवारी पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला. त्यानुसार दुपारी एक वाजता पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुंबईतील पावसामुळे सोमव्री विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. मुंबईतील कर्मचाऱ्यांना सुखरूप घरी जाता यावे म्हणून विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. विधानसभेचे कामकाज आता मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे. मुंबईतील पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असा सल्ला प्रशासनाकडून मुंबईकरांना देण्यात आला आहे.
आमदार, मंत्री अडकले
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाला शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे अनेक आमदार गावी गेले होते. रविवारी रात्री हे आमदार सोमवारच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निघाले. परंतु रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पाऊस सुरु झाला. यामुळे विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदार रेल्वेत अडकले. मुंबईत रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याचा फटका दोन मंत्री आणि दहा ते बारा आमदारांना बसला. त्यात कॅबिनेट मंत्री अनिल पाटील, हसन मुश्रीफ, आमदार संजय गायकवाड, अमोल मिटकरी, जोगेंद्र कवाडे यांच्यासह इतर जणांचा समावेश आहे. आता सोमवारी पुन्हा मुसळधार पाऊस झाला. यामुळे मुंबई पुन्हा तुंबणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन विधानसभेचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियंत्रण कक्षात
पावसामुळे मुंबईतील प्रभावित क्षेत्रांची नियंत्रण कक्षामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. तसेच मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असा सल्ला दिला. नागरिकांनी मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन मी करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मुंबईतील शाळांना सुट्टी
मुंबईतील शाळांनाही पावसामुळे सुट्टी देण्यात आली आहे. सकाळच्या सत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने काढले होते. त्यानंतर दुपारच्या सत्रातील शाळाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.