‘त्यांच्याकडे आता विचारांचा वारसा उरला नाही’, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर केला प्रहार
Devendra Fadnavis on Uddhav Thakeray : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी TV9 मराठीला दिलेल्या महामुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. ते बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारस आहे. ते आता शिवसेनेच्या विचारांचे वारस नसल्याचा प्रहार त्यांनी या महामुलाखतीत केला.
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे वारस आहेत. पण त्यांच्याकडे शिवसेनेच्या विचारांचा वारसा उरला नाही, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. टीव्ही9 चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी त्यांची महामुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप-शिवसेनेच्या नात्याचे अनेक पदर उलगडले. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांची भूमिका आणि वारसावर हल्लाबोल केला.
मुस्लीम मतांसाठी जोगावा
आपला मताचा टक्का कमी होत असल्याचे लक्षात येताच उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांचे लांगुलचालन केले. त्यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. निवडणूक तर आम्ही जिंकणार आहोत. जर एखाद्यावेळेस अशी वेळ आली असती की आपल्याला लांगुलचालन करायचे आहे, पायघड्या घालायच्या आहेत, तर मी निवृत्ती घेतली असती, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
बाळासाहेबांच्या नाऱ्याचा पडला विसर
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची आठवण त्यांनी करुन दिली. बाळासाहेब ठाकरे, हे त्यांच्या भाषणाची सुरुवात, माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी केली, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे राजकारणात आल्यापासून ते कालपर्यंत, लोकसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत, उद्धव ठाकरे हे भाषणाची सुरुवात, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातोंनो अशी करायचे. पण INDIA आघाडीची सभा झाली त्यावेळी ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात देशभक्तोंनो, अशी केली. देशभक्त शब्दावर आमचा आक्षेप नाही, पण त्यांना हिंदू शब्द घ्यायला का लाज वाटते, असा खोचक सवाल फडणवीस यांनी विचारला.
ते केवळ संपत्तीचे वारस
ठाकरे यांना हिंदू शब्द घ्यायची लाज वाटते. कारण ते ज्यांच्या शरणी गेले आहेत, ते नाराज होतील, म्हणून तुम्ही हिंदू शब्द सोडला. त्यामुळेच आम्ही येथे नकलीपणा आहे, असे म्हणतो, असा वाग्बाण फडणवीस यांनी ठाकरेंवर सोडला. ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेतच. कोणी नाही म्हणूच शकत नाही. पण संपत्तीचा वारसा त्यांच्याकडे आहे, विचारांचा वारसा त्यांच्याकडे उरला नाही. त्यांच्याकडे विचारांचा वारसा होता. पण तो आता नाही. विचारांच्या वारशाला त्यांनी तिलांजली दिली आहे. म्हणूनच विचारांचा वारसा कोणी चालवत असले तर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.