मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : इंडिया आघाडीची आज मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीसाठी 28 राजकीय पक्ष एकवटले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला मात देण्यासाठी ही बैठक होत आहे. मुंबईतील हयात हॉटेलात होणाऱ्या या बैठकीत आज महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आजच्या या तिसऱ्या बैठकीत काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कालच्या इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेतून भाजप आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत मोदी यांनाच घेरण्याची रणनीती ठरणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
आज आणि उद्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा लोगो लॉन्च होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत इंडिया आघाडीचा संयोजक नियुक्त करण्याची शक्यताही आहे. या मुद्द्यावर महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. इंडिया आघाडीत को ऑर्डिनेशन राहावं म्हणून एक समितीही स्थापन केली जाणार आहे. तसेच इंडिया आघाडीची जागा वाटपाची आणि भाजपला घेरण्याची राज्य पातळीवरील आणि देशपातळीवरील स्टॅटेजी यावरही चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कालच्या पत्रकार परिषदेत कोणत्याही नेत्याने आजच्या बैठकीचा अजेंडा मांडला नसला तरी या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या बैठकीत निवडणूक नियोजनासाठी एक रणनीती तयार केली जाणार आहे. या आघाडीत 5 ते 10 प्रवक्ते तयार केले जाणार आहेत. त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सोशल मीडिया टीम तयार करण्यावरही या बैठकीत निर्णय होणार आहे. राष्ट्रीय अजेंडा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे. त्याशिवाय निवडणुकीत काय मुद्दे उचलायचे, स्लोगन्स काय असाव्या आणि इंडिया आघाडीची टॅगलाईन काय असावी यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, बसपा अध्यक्ष मायावती यांनी इंडिया आघाडीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मायावती यांनी सोशल मीडियावर एकापाठोपाठ एक चार पोस्ट करून इंडिया आघाडीत सामील होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मायावती यांनी स्वबळावर विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मध्यप्रदेएश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं मायावती यांनी स्पष्ट केलं. इंडिआ आणि एनडीए आघाडी या दोन्ही आघाड्या गरीब विरोधी आहेत. जातीयवादी आहेत. सांप्रदायिक आहेत. आणि भांडवलदार धार्जिण्या आहेत. त्यामुळे अशा आघाड्यांसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं मायावती यांनी म्हटलं आहे.